नवी दिल्ली: सक्षम प्रशासनाच्या अभावानेच दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असताना गृह विभागाचे सचिव आरोपींना अटक केल्याबद्दल दिल्ली पोलीस आयुक्तांची पाठ थोपटतात; ही बाब अनाकलनीय असल्याचे मत माजी मुख्य न्यायाधीश जगदीश वर्मा यांनी व्यक्त केले.

दिल्लीत धावत्या बसमध्ये युवतीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी सुचविण्यासाठी सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय आयोगाचे न्या. वर्मा हे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपला अहवाल गृह विभागाला सादर केला.
सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक केल्याबद्दल गृह विभागाचे सचिव आर. के. सिंग यांनी पोलिसांना शाबासकी दिली; याबद्दल आश्चर्य व्यक्त करून न्या. वर्मा म्हणाले की; सचिवांच्या जागी मी असतो तर नागरिकांचे संरक्षण करू न शकल्याबद्दल पोलिसांना किमान माफी तरी मागायला लावली असती.
इतकी लज्जास्पद घटना घडून गेल्यानंतरही पोलीस त्याबद्दल अत्यंत असंवेदनशील असल्याची न्या. वर्मा यांनी टीका केली. या आयोगाच्या कामाचा एक भाग म्हणून आपण सर्व राज्याच्या पोलीस महासंचालकांना एक प्रश्नावली पाठविली. त्यापैकी कोणीही त्याची दखलसुद्धा घेतली नसल्याची खंत न्या. वर्मा यांनी व्यक्त केली.
भारतीय युवा पिढीचे मात्र न्या. वर्मा यांनी मनापासून कौतुक केले. दिल्ली सामूहिक बलात्कारानंतर तरुणाईने संघर्ष करून कायद्यातील आणि व्यवस्थेतील बदलाच्या आवश्यकतेची जाणीव करून दिली. खऱ्या अर्थाने युवा पिढीनेच ज्येष्ठांना ही शिकवण दिली; असेही न्या. वर्मा यांनी नमूद केले.