शिक्षण क्षेत्रातील अवलिया

औरंगाबाद: माणसाने आयुष्यभर शिकतच राहावे, कितीही शिकले तरी कमीच असते आणि प्रत्येकजण मरेपर्यंत एक विद्यार्थीच असतो, हे बोलण्या- लिहीण्यापर्यंत चांगले वाटते. परंतु, ते प्रत्यक्षात आणणे फार कठीण असते. मात्र, घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत हे सर्व मिळविण्यात एका व्यक्तीला यश मिळाले आहे, ती व्यक्ती आहे आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम जिह्यातील रेडागडी गावची. अशा या अवलियाचे नाव आहे डॉ. पी. जे. सुधाकर ज्यांनी आतापर्यंत तब्बल १०५ पदव्या आणि १२ विषयातील डॉक्टरेट मिळविली आहे.

डॉ. पी. जे. सुधाकर यांच्या नावावर शैक्षणिक पात्रतेचा जागतिक विक्रमही आहे. डॉक्टर सुधाकर यांचा जन्म आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम जिह्यात झाला. राहायला घर नाही, खायला अन्न नाही, परिणामी हॉटेल, शेतात कामे केली पण पदव्या मिळवण्याची भूक डॉक्टर सुधाकर यांनी भागवली. डॉ. सुधाकर यांच्या नावावर सध्या १०५ पदव्या आहेत. शिवाय कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसह १२ विषयात त्यांनी पीएचडी मिळवली आहे.

वैद्यकीय, प्रशासकीय तसेच आंतराष्ट्रीय कायदा, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, मानसशास्त्र, पर्यावरण, पर्यटन, पत्रकारिता, जाहिरात, धर्म-तत्त्वज्ञान आदी क्षेत्रातील पदव्यांचे सुधाकर मानकरी ठरले आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय, सामान्य कायदा आणि धर्म- तत्त्वज्ञान शास्त्रात दोन वेळा डॉक्टरेट मिळवण्याचा विक्रमही त्यांच्याच खात्यावर जमा आहे.

डॉ. सुधाकर यांनी आतापर्यंत स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, हुंडा प्रतिबंध, बहुपत्नीत्व, बालकामगार, वेठबिगार, दारुबंदी, अस्पृश्यता, जातिप्रथा, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भेदभाव आदी समाजविघातक अनिष्टांच्या विरोधात लढा दिला आहे. एरव्ही परीक्षा म्हटले की, सगळ्यांच्याच अंगावर काटा येतो. पण जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतीच गोष्ट अशक्य नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे आंध्रप्रदेशचे डॉ. पी जे सुधाकर हे होय. प्रत्येक माणसाने मनात आणले तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. हे दाखवून देणारेच हे उदाहरण आहे. डॉ. सुधाकर हे सध्या दिल्ली आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक म्हणून पदभार सांभाळत आहेत.