जय महाराष्ट्र ढाबा, भटींडाचे म्युझिक लाँच झोकात

पुणे:‘झेंडा’ आणि ‘मोरया’ या चित्रपटांच्या यशानंतर दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा बहुचर्चित सिनेमा ‘जय महाराष्ट्र ढाबा, बठींडा’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिनेमाचे म्युझिक लाँच मोठ्या जल्लोषात शनिवार वाडा येथे प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी सिनेमाचे निर्माते अतुल कांबळे, राहूल कांबळे, गीतकार गुरू ठाकूर, संगीतकार निलेश मोहरीर, अभिनेता अभिजीत खांडकेकर, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, गायक स्वप्नील बांदोडकर, जान्हवी प्रभु अरोरा आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते उपस्थित होते.

अवधूत गुप्ते यांच्या आधीच्या सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांच्या या ‘जय महाराष्ट्र ढाबा, बठींडा’ या सिनेमाचीही चांगलीच चर्चा सुरू असून प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. यावेळी अवधूत गुप्ते एक प्रेमकथा प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन जरी अवधूत गुप्ते यांनी केले असले तरी त्यांनी या सिनेमाला संगीत दिले नाही. या सिनेमाची गाणी संगीतबद्ध केली ती मालिकांच्या शीर्षक गीतांचे मास्टर असलेल्या निलेश मोहरीर यांनी..

ही एक मराठी मुलाची प्रेमकथा असून ती पंजाबात घडते. त्यामुळे तो पंजाबी बाज संगीतकारांनी अतिशय चांगला जपला आहे. या सिनेमासाठी गीतकार गुरू ठाकूर यांनी पाच गाणी लिहिली असून ती वैशाली सामंत, जान्हवी प्रभु अरोरा, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी गायिली आहे. कोल्हापूरी बाज आणि पंजाबी साज असलेली सर्वच गाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील.

या म्युझिक लाँचला सिनेमातील अभिनेता अभिजीत खांडकेकर याने आणि सहकलाकार प्रियदर्शन जाधव यांनी अनेक कलाकारांसह धमाकेदार नृत्यही सादर केले.

Leave a Comment