वादग्रस्त टाट्रा ट्रकला टाटा मोटर्सने दिला पर्याय

नवी दिल्ली दि. २३ – संरक्षण मंत्रालयासाठी क्षेपणास्त्रे वाहून नेण्याच्या कामी कार्यरत असलेले टाट्रा ट्रक वादग्रस्त ठरल्यानंतर टाटा मोटर्सने त्याच क्षमतेचे देशी ट्रक पुरविण्याचा पर्याय संरक्षणमंत्रालयाला दिला असल्याचे समजते.

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के सिग यांनी टाट्रा ट्रक ची फाईल किलअर करावी म्हणून त्यांना लेफट कर्नलकडून १४ कोटी रूपयांची लाच देऊ केल्याचा आरोप केल्यानंतर त्याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. परिणामी टाट्रा ट्रक चा पुरवठा सध्या स्थगित केला आहेच मात्र सध्या लष्कराच्या सेवेत असलेल्या या ७००० ट्रकची देखभाल आणि दुरूस्ती हीही लष्करासमोरची मोठी अडचण ठरली आहे असे संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक एस.बी. अग्निहोत्री यांनी सांगितले. हे ट्रक प्रामुख्याने पिनाक, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी वापरले जात आहेत.

टाटा मोटर्सने या ट्रकला पर्याय ठरू शकतील असे ट्रक लष्कर आणि विमानदलाला पुरविण्याची तयारी दर्शविली असून त्याचे प्रेझेंटेशनशी देण्यात आले आहे. रशियन आणि बेलारूसियन सरकारनेही अशा प्रकारचे ट्रक पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. टाट्रा ट्रक चा वापर व पुढची खरेदी स्थगित झाल्यामुळे लष्कर आणि विमानदलाचे अनेक महत्त्वाचे प्रकल्पही रखडले आहेत. टाटाची लाईट आणि मध्यम कॅटॅगरीतील वाहने लष्कराकडून वापरली जात आहेतच. पण आता क्षेपणास्त्रे वाहून नेणारी वाहनेही टाटा देऊ करत आहेत असे सांगून अग्निहोत्री म्हणाले की हा करार झाला तर सुरवातीस अनेक चाचण्या घेतल्या जातील आणि मगच अंतिम निर्णय घेतला जाईल