भगव्या दहशतवादाबाबत गृह सचिवांकडून शिंदेंची पाठराखण

नवी दिल्ली:गृह विभागाचे सचिव आर. के. सिंग यांनी मात्र समझोता एक्स्प्रेस, मक्का मस्जिद आणि दर्गा शरीफ येथील बॉम्ब हल्ल्यात सहभागी असलेल्यांमध्ये संघाशी संबंधित किमान १० जणांची नावे आहेत; असे विधान करून गृहमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जयपूर येथे काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगव्या दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे आरोप केला. सुरुवातीला त्यांची पाठराखण करणाऱ्या काँग्रेसने आता मात्र त्यापासून चार हात लांब राहण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘भगव्या दहशतवादा’बद्दल शिंदे यांची पाठराखण करणाऱ्या काँग्रेसने आता मात्र ‘दहशतवादाला रंग नसतो’; असा खुलासा करीत हात वर केले आहेत. भगवा रंग भारताच्या राष्ट्र ध्वजातही असून तो राष्ट्रीयत्वाचे प्रतीक आहे; असा खुलासा पक्ष प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी केला.

परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी मात्र शिंदे यांचे विधान वस्तुस्थितीला धरून असल्याचा दावा करीत शिंदे यांचे समर्थन केले. याबद्दल भाजपने शिंदे यांच्या पाठोपाठ खुर्शीद यांच्यावर तोंडसुख घेतले. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यात भारताने मिळविलेल्या उल्लेखनीय यशावर गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या या बेजबाबदार विधानांनी बोळा फिरविल्याचा आरोप भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केला.

Leave a Comment