नाट्यपरिषद निवडणूकपद्धतीत बदल हवा: मोहन जोशी

पुणे: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक ज्या पद्धतीने होते ती पद्धत चुकीची आहे. लोकशाहीमध्ये मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. परिषदेच्या निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

नाट्य परिषदेच्या पंचवाषिक निवडणुकीत मोहन जोशी यांच्या उत्स्फूर्त पॅनलच्या वतीने पुणे विभागात पाच उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार दादा पासलकर, बाबा कुलकर्णी, प्रफुल्ल महाजन उपस्थित होते.

जोशी म्हणाले की, नाट्य परिषदेची निवडणूक ज्या पद्धतीने घेण्यात येते त्यामध्ये अनेक गोंधळ होण्याची शक्यता असते. बनावट मतपत्रिका तयार करता येऊ शकतात तसेच मतपत्रिका मतदारापर्यंत पोहचू न देता परस्पर कोणीही मतदान करू शकते. यामुळे या निवडणूक पद्धतीत बदल करायला हवा. आम्ही नवीन घटना तयार केली होती त्यामध्ये हे बदलण्यात आले आहेत. मात्र विरोधकांच्या विरोधासाठी विरोध या धोरणामुळे जुन्याच पद्धतीने निवडणूक घेतली जात आहे. नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने घेतलेली निवडणूक आदर्श होती, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नाट्य परिषदेचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईला असल्यामुळे या निवडणुकीच्या मतपत्रिकांची छपाई, मतपत्रिका मतदारांना पाठविण्यासाठी सिलबंद करणे या गोष्टी मुंबईत होणे गरजेचे होते. मात्र विद्यमान अध्यक्षांनी या सर्व गोष्टी त्यांच्या गावात नाशिकला करून संशयाचे वातावरण निर्माण केले आहे. काही मतदारांना अद्याप मतपत्रिका न मिळाल्याने नाना शंका काढल्या जाऊ शकतात; असा आक्षेपही त्यांनी नोंदविला.

जोशी म्हणाले, नाट्य संमेलनाला येण्यासाठी कलाकारांना पैसे देण्यात आले ही पद्धत चुकीची आहे. नाट्य परिषदेच्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी येण्याची आवश्यकता आहे. त्यांचे ते नैतिक कर्तव्य आहे. त्यांना सर्व सोईसुविधा देण्यात येतात मग आणखी वेगळे पैसे का द्यायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नाट्य संमेलनाच्या समारोपाला पदाधिकारी उपस्थित नाहीत असे प्रसंग भविष्यात घडू नयेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नाट्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ कलावंतांच्या सीडी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. २९ कलावंतांच्या सीडी तयार करण्यात आल्या आहेत. नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षा वंदना गुप्ते यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याने हा प्रकल्प गुंडाळावा लागला. नाट्यकलावंतांविषयीची माहिती समाजापर्यंत पोहचविण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण होण्याची आवश्यकता होती, असेही जोशी यांनी सांगितले.

Leave a Comment