दिल्लीश्वरांना खूश करण्यासाठी आयकर खात्याची कारवाई: गडकरी

नवी दिल्ली:आयकर विभागाने आपल्या ‘दिल्लीश्वरां’ना खूष करण्यासाठी आपला काही संबंध नसताना राजकीय हेतूने आपल्या विरुद्ध कारस्थान रचले; असा आरोप भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे. आपली राजकीय प्रतिमा मलीन करून पक्षाध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला बदनाम करण्यासाठीच मुंबईतील काही कंपन्यांच्या चौकशीत आयकर विभागाने आपले नाव गोवले; असेही गडकरी यांच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाने पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या ‘पूर्ती उद्योग समूहाच्या कार्यालयांवर छापे घातले. पूर्ती समूहाने आयकर चुकविल्याबद्दल त्यांच्यावर आरोप आहे. पूर्ती समूहच्या कार्यालयांबरोबरंच या समूहात गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांच्या कार्यालयांची मुंबईतील ८ ठिकाणी आयकर विभागाने चौकशी केली.

भाजप अध्यक्षपदाची दुसरी टर्म गडकरी यांना मिळणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाने केलेल्या कारवाईमुळे त्यांच्या अध्यक्षपदाची दुसरी टर्म स्वीकारण्याच्या स्वप्नांची पूर्ती धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीच आयकर विभागाने कंपनीला नोटीस दिली होती. मात्र गडकरी यांनी पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व्यग्र असल्याने आयकर अधिकाऱ्यांसमोर उपस्थित होण्यास मुदत मागितली होती. आयकर विभागाने गडकरी यांना दि.१ फेब्रुवारी रोजी उपस्थित होण्यास सांगितले आहे.

आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडकरी यांच्या वतीने त्यांच्या दोन प्रतिनिधींनी आयकर विभागाच्या कार्यालयाला गडकरी यांच्या व्यक्तिगत आणि पूर्ती समूहाच्या व्यवहार आणि करविषयक २५ कागदपत्रांचा संच अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.

कॉंग्रेस पक्षाने आत्तापर्यंत आपले ‘राजकीय हिशोब’ चुकते करण्यासाठी केंद्रिय अन्वेषण विभागाचा वापर केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता आयकर विभागामार्फत विरोधकांना त्रास दिला जात आहे; असा आरोप भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केला. या आरोपाचा इन्कार करून काँग्रेसने या कारवाईमागे केंद्र सरकारचा काही संबंध अथवा कोणतेही सूडाचे राजकारण नसून कायद्यासमोर सगळे सारखे आहेत; अशी प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment