चौटाला समर्थकांनी न्यायालयात फोडले गावठी बॉम्ब

नवी दिल्ली: बेकायदा शिक्षक भरती प्रकरणी हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे पुत्र अजय चौटाला यांना न्यायालयाने १० वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात गावठी बॉम्ब फोडले. त्याचप्रमाणे त्यांच्या जमावाने तुफानी दगडफेकही केली.

चौटाला पिता-पुत्रांसह ५३ जणांना शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दि. १६ जानेवारी रोजी दोषी निश्चित केले. मंगळवारी न्यायालयाने त्यांना कारावासाची शिक्षा सुनावली. पदाचा गैरवापर, बनावट कागदपत्र बनविणे, फसवणूक, कट रचणे या गुन्ह्यांसाठी आरोपींना ही शिक्षा ठोठावण्यात आली.

शिक्षक भारती घोटाळा प्रकरणी न्यायालय मंगळवारी शिक्षा सुनावणार असल्याने चौटाला यांच्या हजारो समर्थकांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली. त्यांना न्यायालयाच्या आवारात जाण्यापासून पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न करतांच पोलीस आणि चौटाला समर्थक यांच्यात धुमश्चक्री उडाली. अखेर पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधूराचा वापर करून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र चौटाला पिता- पुत्रांना न्यायालयाने शिक्षा सुनावताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावठी बॉम्ब आणि दगडफेक सुरू केली.

Leave a Comment