इन्कार

महिलांचे लैगिक शोषण हा विषय नेहमीच चर्चेत असतो कामाच्या ठिकाणीही महिलांना मानसिक, लैंगिक त्रासाला बळी पडावे लागते. मात्र त्यातील प्रत्येक घटना उघड होते असे नाही त्याचे कारण महिलेने ही घटना उघड केली तर बदनामी! या पुरूषप्रधान संस्कृतीत महिलेचीच बदनामी होते. हाच धागा पकडून दिग्दर्शक सुधीर मिश्राचा ‘इन्कार’ आपल्या समोर येतो.

‘इन्कार’ ही एका जाहिरात एजन्सीमध्ये नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर पदावर कार्यरत असलेल्या माया (चित्रांगदा सिंग) आणि त्याच कंपनीचा सीईओ राहुल ( अर्जुन रामपाल ) यांची आहे. सोलन (हिमाचलप्रदेश) आणि सहारनपुर (उत्तरप्रददेश ) या मध्यमवस्तीच्या गावांमधून अनुक्रमे माया व राहुल मुंबईला आलेले आहेत. राहुल एका अ‍ॅड एजन्सीत मोठ्या पदावर कार्यरत आहे तर माया नवोदित आहे. एका स्पर्धे दरम्यान त्यांची भेट होते आणि राहुल मायाला आपल्या कंपनीत जॉब ऑफर करतो. आपल्या अनुभव आणि पदाच्च्या बळावर राहुल मायाला पुढे आणतो. त्यांच्यातील बॉस – कर्मचार्‍याचे नाते शारीरिक संबधापर्यंत जाते. नंतरच्या काळात माया अणि राहुल वेगळे होतात कालांतराने पुन्हा दोघे आमने – सामने येतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात
संबध ताणले जातात पुढे काय होते यासाठी इन्कार पहायला हवा.

अटीतटीच्या स्पर्धेत कधी स्त्री सहकारी जास्त पुढे जाऊ नये म्हणून तिला अडसर घालण्यासाठी अथवा प्रमोशनचं गाजर दाखवून लैंगिक शोषण घडण्याची शक्यता निर्माण होते तर दुसरीकडे आपल्या सोबतच्या पुरुषाला धडा शिकवण्यासाठी स्त्रीदेखील आपण लैंगिक शोषणाला बळी पडलोय, असा कांगावा करू शकते. मग जर असं कधी घडलं तर कोणाची बाजू बरोबर आणि कोणाची चूक हे कसं समजावं; याच विषयाभोवती हा चित्रपट फिरतो. माया आणि राहुलच्या बाजूला असलेल्या लोकांमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि जज आहेत.

संपूर्ण चित्रपट फ्लॅशबॅकच्या माध्यमातून आपल्यसमोर येतो. छोटी छोटी दृश्य आणि कट्सच्या माध्यमातून येणारी ही कथा कालानुक्रमाने न येता त्यांची साक्ष सूरू असल्याने आठवेल त्या काळात ती सांगण्यात येते यामुळे नेमक काय सूरू आहे समजून घेण्यासाठी प्रेक्षकाला सजग रहाव लागत. यामुळे काहीवेळा हा चित्रपट एका टेबला भोवती फिरणारी चर्चा आहे असे वाटते. मात्र सुधीर मिश्रा प्रेक्षकाला काय सांगायच आहे याविषयी स्पष्ट असल्याने कोणताही गोंधळ न होता प्रेक्षक कथेशी जोडला जातो.

कोणतेही कार्यालय असो कर्मचार्‍यांमध्ये ईर्ष्या आणि चढाओढ लागलेली आपल्याला पहायला मिळते. माया एक न्यु कमर ते अत्याचार करणारी बॉससुद्धा आहे. तसाच राहुल आहे प्रोत्साहन देणारा बॉस ते स्पर्धेच्या नावाखाली राजकारण करणारा . यशोशिखर गाठण्यासाठी ती कोणत्याही स्तराला जाऊ शकते. एकेकाळी ती अतिमहत्त्वकांक्षी होती. तसेच कंपन्यांमध्ये चालणारे एकूण राजकारण मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.

अर्जुन रामपालने साकारलेला राहुल प्रभावी आहे. त्याला चित्रांगदाची सुरेख साथ मिळाली आहे. दिप्ती नवलही सामाजिक कार्यकर्तीच्या भूमिकेत लक्षात राहते. चित्रपटाच्या कथेला साजेसे संगीत शंतनू मोईत्राचे आहे. छायांकन ही सुद्धा या चित्रपटाची जमेची बाजू आहे. हाय प्रोफाईल ऑफिस कल्चर मांडणारा ‘इन्कार’ पहायला हरकत नाही.

निर्माता – प्रकाश झा, दिग्दर्शक – सुधीर मिश्रा, संगीत – शंतनू मोईत्रा, कलाकार -अर्जुन रामपाल, चित्रांगदा सिंग, दीप्ती नवल

Leave a Comment