अमेरिकेचे रोव्हर यान मंगळाची अगदी आतली माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेच पण अन्य देशांनीही मंगळाची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. पृथ्वीला जवळचा असा हा ग्रह .मंगळावर जीवसृष्टी असेल का हे तपासण्यासाठी हा सारा अट्टाहास जसा चालला आहे तसेच भविष्यात मंगळावर मानवी वसाहती करता येतील का हेही यातून तपासले जात आहे. मंगळावर पाणी असावे असा अंदाज मंगळाच्या अनेक प्रतिमातून बांधला जात आहे. पाणी असेल तेथे जीव तगणार हेही नक्कीच.
मंगळावर आत्ता नसले तरी कधीकाळी नक्कीच पाणी असावे म्हणजे नद्या असाव्यात याचा आणखी एक भककम पुरावा संशोधकांच्या हाती लागला आहे. मार्स एक्स्प्रेस स्पेस क्राफ्टने काढलेल्या फोटोत मंगळाच्या पृष्ठभागावरून नद्या वाहत असाव्यात असा पुरावा मिळाला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हिमनद्यांमुळे जसे चर निर्माण झाले त्यासारखेच चर मंगळावरही आढळले आहेत. या फोटो मालिकेत ४ मैल रूंद आणि ४०० मैल लंाबीचा असा प्रंचड चर आढळला असून तो १ हजार फूट खोल असावा असेही दिसत आहे. अनेक उपनद्याही त्यातून बाहेर पडलेल्या दिसत असून या यानाने काढलेल्या फोटोंची संगणकाच्या सहाय्याने बनविलेली प्रतिमा प्रसिद्ध करण्यात आली आहे.