घसा, अन्ननलिका अथवा स्वरयंत्राचा कर्करोग झाल्याची खात्री संबंधित व्यक्तीला जास्त त्रास न होता, जलद करता यावी यासाठी संशोधकांनी गिळता येणारा कॅमेरा तयार केला आहे. अर्थात हा कॅमेरा घसा, अन्ननलिका येथे कॅन्सरच्या पेशी असल्यास त्यांच्या डिटेल प्रतिमा काढण्यासाठी वापरला जातो. आपण व्हिटॅमिनची गोळी सहज गिळू शकतो ना? हा कॅमेरा या गोळीच्याच आकाराचा आहे आणि त्यामुळे तो सहज गिळता येतो. ज्याची तपासणी करायची असेल त्याला हा कॅमेरा गिळायला दिला जातो आणि वेगाने फिरणार्याा लेसर किरणांच्या सहाय्याने संबंधित भागातील प्रतिमा घेतल्या जातात. सेन्सर लाईट रिफलेक्शन स्वरूपाच्या या मायक्रोस्कोपिक प्रतिमा पेशीतील बदल अचूक नोंदवितात.
सतत होणारी अॅसिडीटी, हार्टबर्न ही कर्करोगाची पूर्वलक्षणे असू शकतात.त्यावेळी घसा, अन्ननलिका, स्वरयंत्राची ही तपासणी त्या भागात कर्करोग तर नाही ना याचा उलगडा करू शकते. हा कॅमेरा बारीक दोरीने बांधलेला असतो त्यामुळे तपासणी झाल्यानंतर तो ही दोरी बाहेर खेचून शरीराबाहेर काढला जातो. या प्रतिमा मॉनिटरवर पाहता येतात. संपूर्ण प्रक्रियेसाठी १ मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागतो. सहा मिनिटांच्या तपासणीत हा कॅमेरा संबंधित भागातून चार वेळा खालीवर जातो आणि अचूक प्रतिमा टिपतो.
सध्या वापरात असलेली इंडोस्कोपी पद्धतही घशातूनच दुर्बिण असलेली नळी शरीरात घालून तेथली तपासणी करते मात्र त्यासाठी किमान १ तास लागतो. त्यामुळे कमी वेळात, रूग्णाला कोणत्याही प्रकारची इजा न करता करण्यात येणारी ही तपासणी लवकरच मोठ्या प्रमाणावर वापरली जाईल असे संशोधकांचे म्हणणे आहे.