राज्याच्या राजकारणापासून गडकरींची फारकत ?

पुणे दि.१७ -‘ निवडणूका केवळ उद्योगपती अथवा झोपडपटयांतील मतदारांवर जिंकता येत नाहीत तर निवडून येण्यासाठी सर्व जातीधर्म तसेच समाजातील सर्व थरांतील मतदारांचा पाठिंबाही आवश्यक असतो. आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात रस नाही मात्र आपण लोकसभेची निवडणूक लढविणार आहोत  ‘ भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी घेतलेला हा  पवित्रा राजकीय विश्लेषकांनी विशेष गंभीरपणे घेतला असून त्यांच्या विधानांचा काळजीपूर्वक अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.

तज्ञांच्या मते गडकरींची ही विधाने म्हणजे भाजपने आता हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला सारून विकासाच्या अजेंड्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. येथील सिंबायोसिस मॅनेजमेंट स्कूलच्या कॅम्पसवर बोलताना गडकरी यांनी काल ही विधाने केली आहेत. यावेळी गडकरी यांनी पुणे आणि मुंबई शहरांच्या विकासाबाबतच्या त्यांच्या कल्पनाही मांडल्या. गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर अनुयायी मानले जातात मात्र निवडणूक जिंकण्यासंबंधीच्या त्यांच्या विधानांनी त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

गुजराथमध्ये विकासाच्या मुद्द्यावर सलग तिसर्यांणदा भाजपला विजय मिळाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांतही हाच मुद्दा भाजपचा मु्ख्य मुद्दा असेल असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे. गडकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात इंटरेस्ट नसल्याचे विधान केले आहे याचाच अर्थ महाराष्ट्राची धुरा गडकरींचे विरोधक व लोकसभेतील उपविरोधी नेते गोपीनाथ मुंड ेयांच्याकडे जाईल याचे स्पष्ट संकेतच मिळत असल्याचे राजकीय संशोधन व अॅनॅलिटिकल संस्थेचे चंद्रकांत भुजबळ यांचे मत आहे. त्यातूनच गडकरी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही आहेत असा निष्कर्ष निघतो असेही भुजबळ म्हणाले.

राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांच्या मते गडकरींनी राष्ट्रीय राजकारणात आपला ठसा उमटवायचा असेल तर संघाचा लोकप्रिय आदर्शवाद थोडा दूर सारला पाहिजे हे ओळखले आहे. इतकेच नव्हे तर गडकरींनी त्या दिशेने कामही सुरू केले आहे असेही त्यांचे मत आहे.