जगन्नाथाच्या जमिनीवरील अतिक्रमण

puri

देशातले कोणते देवस्थान सर्वाधिक श्रीमंत आहे यावर सध्या फार चर्चा चाललेली आहे. केरळातील श्री पद्मनाभ स्वामींच्या मंदिरात जवळजवळ दोनशे वर्षांपासून साठवून ठेवलेली अमाप संपत्ती मोजायला सुरूवात केली तेव्हा डोळे फिरण्याची पाळी आली. तेथे प्रचंड सोने असल्याचे आढळले. त्याची गणती सुरू आहे आणि ती संपत्ती दहा लाख कोटी रुपयांची असावी असा अंदाज बांधला जात आहे. या पूर्वी तिरुपतीच्या बालाजी मंदिराची श्रीमंती फार वाखाणली जात होती. परंतु त्या बालाजीची श्रीमंती पद्मनाभ स्वामींच्यापुढे फिकी पडली. देशातल्या श्रीमंत देवस्थानांमध्ये अशी स्पर्धा सुरू असताना ओरिसातील पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या श्रीमंतीवर प्रकाश पडायला सुरूवात झाली आहे.

पद्मनाभ स्वामी आणि तिरुपतीचा बालाजी यांची श्रीमंती सोन्यामध्ये दडलेली आहे. परंतु पुरीच्या जगन्नाथाची श्रीमंती मात्र सोन्यामध्ये दडलेली नसून सध्या ज्या जमिनीला सोन्याचा भाव येत आहे त्या जमिनीत गुंतलेली आहे. असे लक्षात यायला लागलेले आहे. जगन्नाथाची जमीन नेमकी किती आहे याचा अंदाज अजून आलेला नाही. ज्या ठिकाणी जगन्नाथाच्या नावावर जमिनी आहेत तिथले सारे रेकॉर्ड तपासले असता पुरीच्या जगन्नाथाच्या मालकीची २५ हजार ७११ एकर जमीन आहे असे लक्षात आले. ही जमीन प्रामुख्याने ओरिसात आहे. ओरिसाचे तीस जिल्हे आहेत. त्यातल्या २३ जिल्हयांमध्ये जगन्नाथांची जमीन आहे. त्याशिवाय आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ याही राज्यांमध्ये जगन्नाथांच्या मालकीच्या जमिनी आहेत. सरकार दरबारी नोंद असलेली ही २५ हजार ७११ एकर जमीन खरी आहे असे मानले तरी पुरीचा जगन्नाथ देशातला सर्वात श्रीमंत देव ठरू शकतो.

परंतु आता या देवस्थान समितीच्या व्यवस्थापन समितीवर अरविंद पाधी या आयएएस अधिकार्यातची आयुक्त म्हणून नेमणूक झालेली आहे आणि त्याने या देवस्थानच्या जमिनी आहेत तरी किती याचा छडा लावण्याचे ठरविले आहे. त्याने केलेल्या पाहणीमध्ये असे आढळले की जगन्नाथाच्या मालकीच्या जवळपास ३० हजार एकर जमिनीवर लोकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. देवस्थान समितीच्या आजवरच्या प्रशासकांनी लाच घेऊन या देवाच्या जमिनी अनेक भूखंडवीरांना माती मोल किमतीत विकून टाकल्या आहेत. म्हणजे पुरीचा जगन्नाथ एकूण ५६ हजार एकर जमिनीचा मालक आहे. या अतिक्रमित जमिनी मोकळ्या करण्याची मोहीम अरविंद पाधी यांनी सुरू केली आहे. त्यांनी नुकतीच ओरिसाच्या भुवनेश्वर आणि देलंग या भागातील २५० एकर जमिनीवरील अतिक्रमणे हटविली. या जमिनीची किमत ५०० कोटी रुपये आहे. यावरून ५६ हजार एकराच्या किमतीचा अंदाज येऊ शकतो.

Leave a Comment