पाकिस्तानला धडा शिकवाच

पाकिस्तानने भारताची खोडी काढली आहे आणि त्यानंतर भारताने समझोत्याचे प्रयत्न केले तरीही समझोत्याचे नाटक करून पुन्हा सीमेवरची आपली कृत्ये जारी ठेवली आहेत. २००३ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रबंदी करार झाला होता. त्या करारानुसार प्रत्यक्ष ताबा रेषेवर कोणी कोणावर गोळीबार किवा हल्ले करू नयेत असे उभयपक्षी मान्य करण्यात आले होते पण असले करार पाकिस्तान मानत नाही.  अमेरिकेच्या पाठींब्याच्या जोरावर सतत भारताशी खोडसाळपणे वागत असतो. त्याच धुंदीत त्यांनी २००३ नंतर सुमारे २०० वेळा सीमेवर गोळीबार केला. करार कागदोपत्री राहिला. प्रत्यक्षात पाकिस्तानच्या कारवाया जारी राहिल्या.

पण या कारवायांत आणि गेल्या आठवड्यातल्या कारवायांत एक मोठा फरक आहे. आजवरच्या कारवाया ते आपल्या सीमेतून म्हणजे प्रत्यक्ष ताबा रेषेच्या पलीकडून करीत होते. आता मात्र ताबा रेषा ओलांडून भारतीय हद्दीत येऊन ते गोळीबार करून गेले. अर्थात ते आपल्या हद्दीत येईपर्यंत आपले सैनिक काय झोपा काढीत होते का हा प्रश्न विचारायचा नाही कारण आपण नेहमी गाफीलच असतो. हा आपला राष्ट्रधर्मच झाला आहे. अशा रितीने त्यांनी आपल्या हद्दीत येऊन दोघांना मारले आणि त्यांचे शिर कापून नेले. आपल्या शांततामय धोरणांनुसार त्यांनी गोळीबार केल्यावर आपण त्यांना निषेधाचा खलिता पाठवला.  त्यांनी त्या कागदाची सुरळी करून कचर्याेच्या टोपलीत टाकून दिली आणि आपल्या कारवाया जारी ठेवल्या.

आपल्या देशाची, लष्कराची पाकिस्तानी लष्कराला जराही भीती वाटत नाही. हे लष्कर आपल्या पेक्षा कितीही बलवत्तर असले तरी त्याची ते आक्रमक नाही. म्हणून एखाद्या शांत हत्तीला एखाद्या उंदराने पीडावे तसे पाकिस्तान आपल्याला खिजवत आहे. आपण निषेध केला त्यांनी आपला निषेधाचा खलिता पोचला असे म्हटले आणि लगेच दुसरा गोळीबार केला. आपण मग फ्लॅग मिटींग घेतली. पाकिस्तानने काहीच म्हटले नाही. आपणच म्हटले तुम्ही गोळीबार का केला आहे ते समजून घेतो आणि त्यासाठी फ्लॅग मिटींग घेऊ. ही मिटींग  झाल्यानंतर त्यांनी आपल्या देशात येणारी त्यांची बस बंद केली. एक भिकारडा देश आपल्या पासंगालाही पुरणार नाही एवढी शक्ती असतानाही राजनैतिक दृष्ट्या आपल्यावर किती मात करीत आहे हे बघून अक्षरशः अपमानित झाल्यासारखे वाटते.

पाकिस्तान हा एक किरकोळ देश आहे. आता आपली ताकद एवढी मोठी आही की आपण त्याची सहज चटणी करू शकतो. पण आपण तेवढे आक्रमक नाही. पाकिस्तान बाबत आपली काही स्पष्ट राजनीतीच नाही. त्यांनी हल्ला करायचा आणि आपण नंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायची हेच आपले पाकिस्तानाबाबत प्रतिक्रियात्मक धोरण आहे. आपण पाकिस्तानला कधीच त्रास देत नाही पण त्याचा त्रास मात्र सहन करीत राहतो आणि नंतर पाकिस्तानचा आम्हाला त्रास आहे म्हणून जगासमोर भोकाड पसरतो. आता आपल्या लष्कर प्रमुखांनी यापुढे वाटेला याल तर करारा झटका देऊ असे म्हटले तरी आहे. तेही जनतेचा राग पाहून म्हटले आहे.

पाकिस्तानने भारताच्या हद्दीत येऊन हल्ला केला आणि शहीद जवानांचे शिर कापून नेले या घटनेने जनता फार चिडली आणि तिने सरकारच्या  शांततामय धोरणांची छी थू करायला सुरूवात केली तेव्हा  लष्कर प्रमुखांनी समोर येऊन पाकिस्तानला दम भरला. अर्थात ते केवळ दम देऊन थांबले. प्रत्यक्षात तसा काही जबाब दिलाच नाही. आपल्या हद्दीत आल्यावर त्यांना काय इशारे देत बसायचे आहे की काय ? कसलाही इशारा न देता त्यांचे हातपाय तोडले पाहिजेत. पण काय करावे आपला देश महात्मा गांधींचा देश आहे. एकदा तर आपण आक्रमक होणार नाही ?

आता तर पाकिस्तानात कमालीची अस्थिरता माजली आहे. कारण खुद्द पतप्रधानांना २४ तासांच्या आत अटक करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  यापूवींच्या पंतप्रधानांना याच न्यायालयाने भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याबद्दल पदावरून बडतर्फ केले होते. पण लगत दुसर्यां दा तशीच वेळ या न्यायालयावर आली आहे. हे पंतप्रधान एका ऊर्जा निर्मिती केन्द्राच्या उभारणीत पैसे खाऊन बसले आहेत. त्यांच्यावरचा हा आरोप सिद्ध झाला असल्याने त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरे तर तिथल्या संसदेची मुदत संपत आली होती आणि येत्या तीन महिन्यांत दुसरी निवडणूक होणार होती पण, त्याच्या आतच पंतप्रधानांच्या हातात बेड्या पडल्या तर निवडणुकीच्या पूवीं दोन तीन महिन्यांसाठी नव्या पंतप्रधानांची करावी लागणार आहे. त्यातून राजकीय अस्थिरता निर्माण होईल या अस्थिरतेचा फायदा आपल्याला घेता येईल पण त्या पद्धतीचे राजकारण करणारे नेते असले पाहिजेत. आपले नेते पाकिस्तानात काही झाले तर त्याचा राजकीय फायदा तर घेत नाहीतच पण त्या घटनांनी तिथले नेते गोंधळात पडत नसतील एवढे आपलेच नेते गोंधळात पडतात. धन्य आहे !

Leave a Comment