धडा शिकवाच

भारतीयांची अंतःकरणे देशाच्या स्वाभिमाना साठी तडपत आहेत. पाकिस्तानच्या आगळिकीला बळी पडलेल्या वीर जवान हेमराजची आई आणि पत्नी गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. हेमराज याचे पाकिस्तान्यांनी नेलेले शीर परत आणावे अशी त्यांची मागणी आहे. ते परत आणले नाही तर आपण जगणार नाही असा निर्धार त्याच्या नुकतीच प्रसूत झालेल्या पत्नीने केला आहे. भारताच्या सरसेनापतींनी पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे पण आज ते शीर आपणा सर्वांच्या  प्रतिष्ठेचे प्रतिक बनले आहे. मोठ्या क्रूरपणे ते धडावेगळे करून पाकिस्तानात नेणारया पाक जवानांवर तिथे पाकिस्तान सरकारने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. पण ते परत आणण्याची आपली हिमत नाही. 

अमेरिकेने ओसामा बिन लादेनला शोधून काढून ठेचून मारले तसे वाटेल ते करून ते हेमराजचे शीर परत आणायला भारत म्हणजे काही अमेरिका नाही. पाकिस्तानपेक्षा शस्त्र सज्ज असूनही कचदिल नेत्यांमुळे आपली या भिकारड्या पाकिस्तानसमोर अशी परवड होत आहे. पाकिस्तानला धडा शिकवालच पाहिजे असे भारतीयांना वाटते. पण भारताची एक शोकांतिका आहे की भारतीय लोक पाकिस्तान बाबत एका आवाजात बोलत नाहीत. पाकिस्तानी लोक आपापसात कितीही भांडत असले तरीही ते भारताबाबत मात्र एका आवाजात बोलत असतात. पाकिस्तानने दोघा भारतीय जवानांना मारले आहे तर भारताने पाकिस्तानचे किमान चार जवान मारले पाहिजेत. हा देश महात्मा गांधींचा आहे हे माहीत आहे. त्याचमुळे आपण पाकिस्तानची खोडी काढणार नाही पण त्याने खोडी काढली तर त्याला मुहतोड जबाब द्यायला गांधी तत्त्व आडवे येत नाही आणि ते नीट न समजलेले नेते सत्तेवर असतील तर त्यांना हे समजून सांगावे लागेल की अशा खोड्यांना जबाब देण्यात गांधी तत्व आडवे येता कामा नये.

आज हेमराजचे शीर हे आपल्या देशाची इभ्रत होऊन बसले आहे. आपले कचदिल नेते ही इभ्रत कशी सांभाळतात याची आता प्रतीक्षा आहे. हेमराजचा शिर नसलेला देह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला असल्याने त्याचा मान राखला गेला नाही अशी त्याच्या कुटुंबाची भावना झाली आहे. त्याच्या या अपमानाची भरपायी करण्यासाठी त्याचेच शिर आणता येणार नाही पण येत्या २४ तासाच्या आत त्याचा बदला घेऊन किमान पाच पाक जवानांची डोकी आणली जातील असे तरी सरकारने आणि आपल्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले पाहिजे पण त्यांचाही आवाज नाही.

आपल्याला पाकिस्तानशी लढताना आपल्या ताकदीची काही जाणीवच नसते. आपले जवान लढत असतात तेव्हा आपल्या नेत्यांचे डोळे अमेरिकेकडे लागलेले असतात. एवढे आपण पाकिस्तान  बाबत अमेरिका धार्जिणे झालो आहोत. कसल्याही विरश्रीचे प्रदर्शन करण्याची वेळ आली की आपल्या देशात शांततेवर प्रवचने झोडणारे लोक पुढे सरसावतात. आपण पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तान अणुबाँबचा वापर करील अशी भीती आपल्याला लढाई सुरू होण्याच्या आधीच  वाटायला लागते. आपणही अण्वस्त्र सज्ज आहोत मग पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांना भीत नाही पण आपण मात्र त्याच्या अणुबाँबला टरकून असतो. ही कसली आलीय महाशक्ती ? कसला पुरुषार्थ म्हणून नाही. एवढ्या किरकोळ देशाला किती दिवस घाबरणार ?

हल्ल्याला प्रतिहल्ल्याने उत्तर देणे यात उथळपणा असतो असे मानणारा एक अभ्यासक वर्ग आपल्या देशात आहे. टोल्याला प्रतिटोला हे खरे उत्तर नसते, आंतरराष्ट्रीय राजकारण फार वेगळे असते, त्याचा विचार करावा लागतो अशी काही बुद्धीवादी लोकांची भाषणे सुरू होतात. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगला देश निर्माण केला तेव्हा आणि वाजपेयी यांनी अणुचाचण्या घेतल्या तेव्हाही या मंडळींनी अशीच प्रवचने झोडली होती पण शेवटी काय झाले ? काय बांगला देशाच्या निर्मितीला मदत केली म्हणून भारताला कोणी वाळीत टाकले का ? अण्वस्त्रांच्या चाचण्या घेतल्या म्हणून कोणी भारतावर निर्बंध लादले आणि भारताची उपासमार झाली का ? असल्या या अटकळीवर आधारलेल्या अंदाजांची पर्वा न करता शौर्याचे प्रदर्शन घडवलेच पाहिजे.

जास्त विचार करण्याने शेवटी सेनादलाचे मनोधैर्य खचण्याची आणि देशवासियांचा स्वाभिमान मातीमोल होण्याची भीती असते. आणि आपण ज्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एवढा बाऊ करतो त्या राजकारणाची पाकिस्तानला काहीच भीती नाही का ? पाकिस्तान त्याचा विचार न करता आपल्या अंगावर चालून येत असेल तर आपण त्या राजकारणाचा किती दिवस विचार करीत बसायचे आहे ? आपल्या देशातल्या लोकांना आणखी एक विकृती जडली आहे. पाकिस्तान मधील गोंधळ आणि बजबजपुरी कडे पाहून समाधान मानण्याची ही विकृती आहे. हे लोक असा विचार करत असतात की नाही तरी पाकिस्तान हे पोखरलेले राष्ट्र आहे. पण पाकिस्तानात कितीही बजबजपुरी असली तरी ते सारे पोखरलेले लोक भारताच्या विरोधात मात्र एक होत असतात.

Leave a Comment