कलमाडींच्याच कोठडीत चौतालांची रवानगी

नवी दिल्ली दि.१७- शिक्षक भरती घटाळ्यात अटक करण्यात आलेले हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला आणि त्यांचे आमदार पुत्र अजय चौताला यांची तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी खासदार सुरेश कलमाडी यांना तिहारमध्ये ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते तीच चार नंबरची कोठडी चौताला यांनाही दिली गेली असल्याचे कायदा अधिकारी सुनील गुप्ता यांनी सांगितले.

गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार चौताला पितापुत्रांबरोबरच आयएएस अधिकारी संजीवकुमार आणि विद्याधर यांनाही तुरूंगात टाकण्यात आले आहे. ओमप्रकाश चौताला यांना पायांचे दुखणे असल्याने त्यांना तुरूंगातीलच एक कैदी मदतनीस म्हणून देण्यात आला असून त्यासाठी चौताला यांना त्या कैद्याला पगार द्यावा लागणार आहे. त्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही सुविधा त्यांना देण्यात आलेली नाही. या कोठडीतील १७ महिला कैद्यांना कोठडी सहात तर ३४ पुरूष कैद्यांना पाच नंबरच्या कोठडीत हलविले गेले आहे. चौताला यांचा संबंध अन्य कैद्यांशी येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.

तिहार तुरूंगातील चार नंबरची कोठडी ही विशेष कोठडी आहे. येथे ध्यानधारणेसाठी सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या कोठडीला विपश्यना वॉर्ड असेच संबोधले जाते. येथे कैदी ध्यानधारणा करू शकतात. सुरेश कलमाडींच्या अगोदर अण्णा हजारे यांना जेव्हा आंदोलन केल्याप्रकरणी तिहार मध्ये आणले होते तेव्हा त्यांनाही हीच कोठडी दिली गेली होती असे समजते.

दरम्यान चौताला पितापुत्रांना तुरूंगात आणल्यानंतर तुरुंगाबाहेर त्यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आदेशाविरोधात निदर्शने केली आणि चौताला यांना पाठिंबा दर्शविला असेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment