अनामिकेच्या मित्राने नाकारले पोलिस संरक्षण

नवी दिल्ली दि.१५ – सामुहिक बलात्काराची शिकार बनलेल्या तरूणीच्या मित्राने दिल्ली पोलिसांतर्फे देऊ करण्यात आलेले पोलिस संरक्षण नाकारले असल्याचे समजते.  दिल्लीत १८ डिसेंबरच्या रात्री चालत्या बसमध्ये तेवीस वर्षीय युवतीवर झालेला सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर तिच्यासह तिच्या मित्राला मारहाण करून बसमधून बाहेर फेकून देण्याच्या घटनेतील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी त्यातील पाच जणांनाच तिहार जेलमध्ये पाठविण्यात आले आहे. सहावा आरोपी बालगुन्हेगार असल्याने त्याला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

बळी पडलेल्या संबंधित मुलीचा मित्र या केसमधील प्रत्यक्ष दर्शी आणि महत्त्वाचा साक्षीदार आहे हे ध्यानात घेऊन दिल्ली पोलिस कमिशनर नीरजकुमार यांनी या २८ वर्षीय तरूणाला आणि त्याच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले. त्यानुसार या मुलाच्या गोरखपूर येथील घरी सकाळीच उपनिरीक्षक दर्जाचा पोलिस अधिकारी हजरही झाला. मात्र या मुलाने पोलिसांचे संरक्षण नाकारले.

याविषयी अधिक माहिती देताना या तरूणाचे वडील म्हणाले की आम्ही देशात सुरक्षित आहोत. देशातील सर्व जनता आमच्यामागे उभी आहे मग आम्हाला पोलिस संरक्षणाची गरज काय?

Leave a Comment