शिवसेनेत गटबाजी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यच्या निधनानंतर अनेकनी हा प्रश्न विचारला होता की, बाळासाहेबांच्या माघारी या पक्षाचे काय होणार ? आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकेल का ? यावर फार भावनेच्या आहारी न जाता काही पत्रकारांनी असे विश्लेषण केले होते की, बाळासाहेबांच्या माघारीच काय पण बाळासाहेब हयात असताना तरी विधानसभेवर भगवा कधी फडकला होता ? १९९५ सालचा अपवाद वगळता  विधानसभेवर कधीच भगवा फडकला नव्हता. मग त्यांच्या हयातीत जे झाले नाही ते त्यांच्या माघारी कसे होईल ? बाळासाहेबांची संघटनेवर पकड होती असे म्हटले जाते पण ते तरी कितपत खरे होते ? त्यांची ती पकड असतानाही छगन भुजबळ पक्ष सोडून गेले. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, लखोबा गेला तरीही मला सत्ता मिळाली. ते खरे ठरले आणि शिवसेनेच्या हाती सत्ता  आली.

नंतर पुन्हा कधीच ते शक्य झाले नाही. नारायण राणे आणि राज ठाकरे हेही दोघे बाहेर पडले. त्याही वेळा बाळासाहेब म्हणाले, असे कोणीही बाहेर पडले तरीही माझा शिवसैनिक माझ्याच मागे राहणार आहे. यावेळी मात्र ते खरे ठरले नाही. बाळासाहेबांची पकड असूनही अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेला शेवटचा जय महाराष्ट्र केला. कोकणातला प्रभाव कमी झाला. मराठवाड्यातला मतदार दूर गेला आणि मुंबईत उत्तर भारतीयांनी काँग्रेसला पसंती दिल्याने शिवसेना मागे पडली. त्यातूनही जे काही उरलेले प्रभावी क्षेत्र होते त्याला राज ठाकरे यांनी सुरूंग लावला. बाळासाहेब हयात असताना हे घडले मग त्यांच्या मागे काय काय होईल, असे विचारले जात होते. त्याचा प्रत्यय यायला लागला आहे. अनेकांनी शिवसेना सोडायला  सुरूवात केली आहे अनेकांनी शिवसेनेत राहूनच पण आपली नाराजी व्यक्त केली आहे तर अनेक जण गटबाजी मुळे त्रस्त असल्याचे उघडपणे बोलत आहेत.

एकंदरीत शिवसेनेला गळती लागण्याची चिन्हे दिसायला सुरूवात केली आहे. नाशिक येथे माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल यांना पक्षातून हाकलण्यात आले आहे. त्यांनी आपल्या सोबत आणखी दोघा मातबर नेत्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची राहुटी गाठली आहे. कोल्हापुरातही जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आपली नाराजी जोरात व्यक्त केली आहे. जिल्हा संफ प्रमुख दिवाकर रावते यांनी कोल्हा पूरच्या नेत्यांशी वागताना पक्षपात केल्याने चिडलेल्या संजय पवार यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देऊन सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आहे. कोल्हापुरातले हे मतभेद फारच खालच्या पातळीवर पोचले असून नाराज नेत्यांनी ‘जुते मारो दो’ या घोषणे खाली मोर्चा काढला होता.

शिवसेना प्रमुखांचे निधन झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी निधनानंतरचा पहिला जनसंपर्क दौरा काढला होता. त्या दौर्यारत त्यांनी कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना, आता रडायचं नाही, लढायचं, असा संदेश दिला होता. तो संदेश शब्दशः पाळत तिथले शिवसैनिक आता लढायला लागले आहेत पण ते आपापसात लढत आहेत. आता सध्या किमान तीन जिल्ह्यात शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. बाकीच्या जिल्हयातही मतभेद कमी नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या संधीचीच वाट पहात आहेत. या पक्षाने शिवसेनेतल्या संभाव्य गोंधळाचा गैर फायदा घेण्याचे ठरवले आहे. किंबहुना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी  आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना शिवसेनेच्या मतदारसंघांवर लक्ष ठेवायला सांगितले आहे.  बाळासाहेबांच्या जाण्याने पक्ष नेतृत्वहीन होईल आणि अनेक नेते कार्यकर्ते बाहेर पडतील. पोकळी निर्माण होईल  ती भरून काढायला राष्ट्रवादीने पुढे आले पाहिजे असे पवारांचे म्हणणे आहे.

एकंदरीत पवारांचे शिवसेनेवर लक्ष आहे. त्यामुळे सेनेतून बाहेर पडणार्याो नेत्यांसाठी राष्ट्रवादीच्या पायघड्या अंथरलेल्या असतील. पवारांना राष्ट्रीय राजकारणात मोठी कामगिरी बजावण्यासाठी मोठी शक्ती हवी आहे ती शिवसेनेतून मिळेल अशी त्यांची अटकळ आहे. राज्यात ज्या ज्या वेळी पक्षांतराचा खेळ खेळला गेला तेव्हा प्रामुख्याने या दोन पक्षातच जा ये झाली. केवळ शिवसेनाच नाही तर अन्यही काही पक्षातल्या  कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात काही स्थान मिळेनासे झाले की राष्ट्रवादीत जावेसे वाटते कारण राष्ट्रवादीला आज खंबीर आणि जाणते नेतृत्व आहे.

शिवसेनेत केवळ तळागाळातच नाही तर वरच्या पातळीवरही मतभेद आहेत. शीर्षस्थ म्हणवल्या जाणार्याी नेत्यांत काही नेते भाजपाच्या जवळचे आहेत तर काही नेते पवारांचे चाहते आहेत. मागे  बाळासाहेबांच्या हयातीतच एका नेत्याने भाजपाशी असलेली संगत सोडून पवारांशी हातमिळवणी करण्यासाठी चर्चेलाही सुरूवात केली होती. नंतर बाळासाहेबांनीच ती अनाहूतपणे चाललेली चर्चा थांबवली. पण शिवसेनेतले मतप्रवाह काही उघड झाल्याशिवाय राहिले नाहीत. आता या मतभेदाची छाया पसरायला लागली आहे. म्हणूनच ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. अर्थात तो कोणी मानणार नाही. 

Leave a Comment