हिलरी सार्वजनिक जीवनातून बाहेर – पण किती काळासाठी हे गुपित

वॉशिग्टन दि.१७ – अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन आपल्या पदावरून पायउतार होत आहेत. गेल्या ३४ वर्षातील सार्वजनिक जीवनानंतर प्रथमच हिलरी सर्वसामान्य नागरिक म्हणून आपले आयुष्य जगणार आहेत. मात्र त्या राजकीय क्षेत्रापासून २०१६ पर्यंतच दूर राहतील आणि पुन्हा अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रध्यक्ष बनण्यासाठी अध्यक्षीय निवडणूक लढवितील असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

हिलरी यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक खरोखर लढवायची असेल तर त्यांच्याकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कॅबिनेटमधील त्या सर्वाधिक लोकप्रिय प्रतिनिधी आहेतच पण देशातील सर्वाधिक अॅडमायरर्ड वुमन म्हणूनही अमेरिकनांनी त्यांनाच पसंती दिली आहे. येथे हिलरी यांनी फर्स्टलेडी मिशेल यांनाही मागे टाकले असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षालाही त्या हव्याच आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द खरोखरच कमालीची यशस्वी ठरली असून त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी त्यांनी अतिशय योग्य रितीने पार पाडली आहे.

पब्लिक पॉलिसी पोलिग सर्वेमध्ये हिलरी पक्षाला हव्या असल्याचे स्पष्ट दिसून आले असून ५७ टक्के डेमोक्रॅटनी हिलरी यांना पसंती दिली आहे. त्यांचे पती व माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही हिलरी यांना व्हाईट हाऊसमध्ये पाहायला आपल्याला फारच आवडेल असे विधान केले आहे. अर्थात तज्ञांच्या मते मात्र हिलरी यांना खरोखरच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवायची असेल तर त्या पदासाठी आपण पूर्ण तंदुरूस्त असल्याचे सर्टिफिकेट सादर करावे लागेल.

हिलरी यांना नुकताच मेंदूत रक्ताची गुठळी होण्याचा विकार झाला होता. त्यातून त्या पूर्ण बर्या  झाल्या असल्या तरी पुढील राष्ट्रपती निवडणुकांच्या वेळी त्यांचे वय ६९ असेल. हे वय या पदासाठी जास्त आहे. त्याचबरोबर या पदावर आरूढ होताना अनेक आव्हाने स्वीकारावी लागतात व त्यासाठी तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणे गरजेचे असते असे या तज्ञांचे मत आहे.

हिलरी यांनी मात्र गेली वीस वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत, खूपच धावपळीचे जीवन त्या जगल्या आहेत आणि त्यामुळे आता थोडी विश्रांतीच हवी आहे असे सांगितले आहे. अर्थात निवृत्तीनंतर त्या महिला आणि मुलांसाठी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतील असे त्यांच्या निकटवर्तीयंचे म्हणणे आहे.

Leave a Comment