सोनीचा वॉटरप्रूफ फोन

मोबाईल वापरणाऱ्या लोकांपैकी किमान १० जणांपैकी एकाचा फोन तरी पाण्यात भिजल्याचे, सिंकमध्ये पडल्याचे अथवा टॉयलेटमध्ये पडल्याचे प्रसंग घडले आहेत. अशा प्रकारे पाण्यात पडलेले मोबाईल निकामी ठरतात हा अनुभव मोबाईल धारकांना येत असतोच. पण सोनीने यावर नामी उपाय शोधला असून वॉटरप्रूफ हँडसेटची निर्मिती केली आहे.
 
सोनीच्या एक्सपिरीया झेड हा हँडसेट तुम्ही शॉवर घेत असतानाही बिनधास्तपणे वापरू शकणार आहातच पण अगदी तो टॉयलेटमध्ये पडला तरी तो सुरू राहणार आहे. कंपनीच्या दाव्याप्रमाणे हा हँडसेट १ मीटर म्हणजे तीन फूटांपेक्षा अधिक खोल पाण्यात ३० मिनिटे कोणतेही डॅमेज न होता राहू शकणार आहे. टॉयलेटमध्ये पडलेला फोन घाण झाला असेल तर तो साध्या पाण्याने स्वच्छ धुताही येणार आहे. या हँडसेटची सर्व पोर्ट प्लॅस्टीक कोटेड कव्हरने आच्छादलेली आहेत.

१२.७ सेंमीचा स्क्रीन असलेला हा फोन एनएफसी चीपने युक्त आहे. तसेच अँड्राॅईड ऑपरेटिंग सिस्टीम त्याला देण्यात आली असून १३ मेगापिकसलचा कॅमेराही आहे. यातील एनएफसी चीपच्या सहाय्याने टिव्हीचा व्हिडीओ ऑपरेट करता येणार आहेच पण भविष्यात त्याचा वापर क्रेडीट कार्ड म्हणूनही करता येणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. हा फोन लास वेगास येथे नुकत्याच पार पडलेल्या कन्झ्युमर इलेक्ट्रोनिक शोमध्ये सादर करण्यात आला आहे आणि तो अॅपलच्या आयफोनला तगडी टक्कर देईल असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

Leave a Comment