सिरीया विद्यापीठ स्फोटात ८५ ठार, २०० जखमी

अलेप्पो दि.१६ – गेली दोन वर्षे सिरीयात सुरू असलेल्या सिव्हील वॉरमध्ये प्रथमच अलेप्पो विद्यापीठावर दोन रॉकेट डागण्यात आली असून त्यात किमान ८५ जण ठार तर २०० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांत आणि जखमींत प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश असून कांही नागरिकांनीही या विद्यापीठातील विद्यार्थी निवासस्थानात आश्रय घेतला होता असे समजते.

या हल्ल्याबाबत बंडखोर आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप करत असून या हल्ल्यामागचे कारण अद्यापी स्पष्ट झालेले नाही. मात्र हा हल्ला इतका प्रखर होता की त्यामुळे विद्यापीठाचा मोठाच भाग उध्वस्त झाला, अनेक  मोटारी पेटल्या. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्र वार्ता संस्थेने बंडखोरांनी हे हल्ले केल्याचा आरोप केला आहे तर बंडखोरांनी अध्यक्ष बशर अल आसद यांच्या सेनेनेच दोन रॉकेट एअर स्ट्राईक करून डागल्याचा आरोप केला आहे.

अलेप्पो हे सिरीयातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. गेली दोन वर्षे सरकार आणि बंडखोरांत चकमकी होत आहेत मात्र त्याचा धक्का विद्यार्थ्यांना कधीच बसला नव्हता. सिव्हील वॉर सुरू झाल्यापासून सिरीयात गेल्या दोन वर्षात ६० हजार लोक मारले गेले असल्याचेही समजते.

Leave a Comment