संमेलन आणि वाद

मराठी साहित्य संमलेन होणार असे सूचित होताच त्यासंबंधातल्या वादांनाही तोंड फुटते आणि ते संमेलन संपेपर्यंत त्यात अनेक प्रकारचे वाद सुरू राहतात  तसे चिपळूण येथे होणार्या  साहित्य संमेलनातही वादाला सुरूवात झाली आहे. अलीकडच्या काळात दोन तीन साहित्य संमेलने तर विलक्षण गाजली. महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष आनंद यादव यांना अध्यक्षपद सुध्दा घेऊ दिले नाही आणि ते संमेलन बिन अध्यक्षाचे पार पडले. महाराष्ट्रातच काय पण जगात अशी घटना कोठे घडली नसेल. डॉ.आनंद यादव यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिताना जे काही वर्णन केले त्यामुळे चिडलेल्या काही लोकांनी त्यांच्या विरूध्द आरडा ओरडा केला आणि त्यांना साहित्य संमेलनाला जाऊच दिले नाही. बाकी छोटे मोठे वाद तर नेहमीच सुरू असतात. एकही वाद न होता एखादे साहित्य संमेलन पार पडू शकेल का असा प्रश्न मनात निर्माण होतो.

गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी बीड येथे पत्रकारांशी बोलताना साहित्यिकांनी बिनवादाचे एक तरी साहित्य समंलेन घेऊन दाखवावे असे आवाहन केले आहे. अर्थात आर. आर. आबांना तसे काहीही म्हणण्याचा अधिकार नाही. कारण ते ज्या मंत्रिमंडळात काम करत आहेत ते मंत्रिमंडळ पूर्णपणे वादाने पोखरलेले आहे. शासनाचा एकही निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या वादाशिवाय घेतलाही जात नाही आणि अंमलात आणलाही जात नाही. तेव्हा अशा मंत्रिमंडळात असलेल्या आर. आर.आबांनी साहित्यिकांना बिनवादाचे साहित्य संमेलन घेण्याचे आवाहन करणे हा एक विनोद आहे.

मात्र सध्याच्या काळामध्ये साहित्य संमेलनांमध्ये फारच वाद होत आहेत. साहित्य संमेलन कोठे घ्यावे इथपासून वादाला सुरूवात होते आणि अनेक लहान मोठे वाद होत होत ते साहित्य संमेलन वादातच पार पडते. शेवटी वाद कमी झाले म्हणून की काय पण संमेलनाच्या हिशोबावरूनसुध्दा वाद होतात. पुण्यात झालेल्या साहित्य संमेलनाच्या खर्चाच्या हिशोबावरून वाद झाल्याचे सर्वांना आठवतच असेल. ठाण्यात झालेल्या साहित्य संमेलनात तर स्मरणिकेत चक्क नथुराम गोडसेचाच लेख छापला होता आणि त्यावरून वाद झाला होता. यापूर्वी सोलापूर, नगर, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनात वाद झाले हे नक्की परंतु ते फार टोकाला गेले नाहीत आणि ते कामकाजातले किरकोळ वाद होते.

चिपळूण येथील साहित्य संमेलन मात्र अनेक वादांनी गाजत आहे. परशुरामाचा परशु संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर छापावा की नाही असा एक वाद निर्माण झाला आहे.  संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे की नाही असा एक विषय पुढे आला आहे. परशुच्या मागणीवरून संभाजी ब्रिगेडने समंलेन उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. तर ठाकरे यांच्या नावाला पुष्पा भावे यांनी विरोध केला आहे. मात्र या दोन्ही गोष्टी आहे तशा ठेवण्याचा संयोजकांचा निर्धार आहे आणि त्यांनी तो जाहीर केला आहे.

साहित्य संमेलनातला सगळ्यात मोठा वाद म्हणजे पुढार्यां ची उपस्थिती साहित्यिकांच्या वासपीठावर पुढारी असावेत की नाही हा काही नवा वाद नाही. सुमारे ५० वर्षांपासून साहित्य संमेलन म्हणताच हा वाद उपस्थित केला जातो. साहित्य संमेलन हे साहित्यिकांचे असावे त्यामध्ये पुढार्यांूचे काय काम असा प्रश्न काही लोक विचारतात. खरे म्हणजे साहित्यिक नावाचा काही वेगळा प्राणी नसतो. एखादा साहित्यिक नेता असू शकतो, एखादा साहित्यिक प्राध्यापक असू शकतो आणि एखादा साहित्यिक शेतकरीसुध्दा असतो. तेव्हा जो साहित्यिक आहे त्याचा व्यवसाय काहीही असो तो व्यासपीठावर असला पाहिजे आणि त्याच्यासाठी साहित्य संमेलन असते. पण बघावे तर पुढार्यांवची एवढी गर्दी होते की बिचारे साहित्यिक त्या व्यासपीठावर एका कोपर्यायत बसलेले असतात.

खरे म्हणजे हा वादाचा विषय होऊ नये. कारण पुढार्यां ची अशी गर्दी साहित्य संमेलनाच्या परिसंवादाला किवा कवी संमेलनाला नसते. या दोन कार्यक्रमात व्यासपीठावर एकही पुढारी नसतो. त्याची उपस्थिती प्रामुख्याने असते. ती उद्घाटन आणि समारोपाच्या समारंभाला. या दोन समारंभात मात्र पुढारी व्यासपीठावर गर्दी करत असतात. त्यांना टाळता येत नाही. कारण संमेलन भरवणे हे काही सोपे काम नाही.

चिपळूण साहित्य संमेलनाचा खर्च अडीच कोटी रुपयांपर्यंत गेलेला आहे. या खर्चाचा भार सहन करायचा झाला तर त्यासाठी देणग्या हव्यात, सरकारचे अनुदान हवे, शिवाय स्मरणिकेतल्या जाहिरातीही हव्यात. या सगळ्या गोष्टी पुढार्यांीच्या वजनाने मिळत असतात. मग पैसा जमवायला पुढारी लागत असतील तर उद्घाटन समारंभाला पुढारी का नको ? पुढारी मंडळी अशा बाबतीत तर फारच आग्रही असतात. कारण व्यासपीठावर जर आले नाही तर त्यांची लोकप्रियता वाढत नसते. तेव्हा ही गोष्ट आता अपरिहार्य झाली आहे. गंमतीचा भाग असा की काही विशिष्ट पुढारी जवळपास प्रत्येक संमेलनाचे उद्घाटन करत असतात आणि स्वतःहून ते कधीच हे काम टाळत नाहीत.

Leave a Comment