तारतम्य पाळा

दिल्लीतल्या त्या दुदैंवी प्रकारानंतर देशभरात चर्चा सुरू झाली. खळबळ माजली पण सर्वांच्या मनात या प्रकाराबद्दल चीडच दिसून आली. घटनेला आता पंधरा दिवस होऊन गेले आहेत आणि आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे अनेकजण आपली निरनिराळी मते मांडायला लागले आहेत. काही वेळा काय होते की, एखादी चर्चा एकाच दिशेने जायला लागली की काही लोकांना उगाच राग येतो आणि ते चिडून सर्वांच्या पेक्षा वेगळा विचार मांडायला लागतात. काही लोक खाजगी गप्पांत असाही विचार मांडतात की, महिलांना जादा स्वातंत्र्य मिळाल्याचा हा परिणाम आहे. त्या २३ वर्षांच्या मुलीने एवढ्या रात्री घराबाहेर पडण्याचे कारणच काय होते ? हा तर स्वैराचार झाला. अशा मुली रात्री बेरात्री घराबाहेर फिरायला लागल्या की असे प्रकार घडणारच.

काही लोकांचा हा विचार आहे. तो सर्वार्थाने खरा नाही पण मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद करणारांना हा विचार पटतो. एखादा मुलगा रात्री घराबाहेर पडला आणि त्याला काही गुंडांनी गाठून मारले. त्याच्या जवळचे पैसे लुटले तर अशा वेळी कोणी असा प्रश्न विचारत नाही की, तो मुलगा रात्री घराबाहेर पडलाच कशाला ? रात्री बेरात्री फिरण्याचा हा परिणाम आहे असे कोणी म्हणत नाहीत. मुलगा म्हटल्यावर तो रात्री बेरात्री फिरणारच असे आपण मानून चालतो. असे फिरल्यावर लुटमार होणारच असे काही आपण समजत नाही. मुलीच्या बाबतीत असे घडल्यावर मात्र तिने रात्री फिरावेच कशाला? असा प्रश्न केला जातो. मुलींनी रात्री बेरात्री फिरावे की नाही हा वेगळा वादाचा विषय आहे पण ती रात्री बेरात्री घराच्या बाहेर पडली म्हणजे तिच्यावर बलात्कार होणारच असे म्हणून कसे चालेल ? रात्री फिरल्याबद्दलची ती काय वैध किवा अभावितपणे मिळणारी शिक्षा आहे की काय ? यातून आपण काय सूचित करत असतो ? मग पुढे चालून हे लोक असेही म्हणायला लागतील की, रात्रीच काय पण दिवसा तरी मुलींनी घराच्या बाहेर पडण्याचे कारण काय ? 

विचार करण्याची ही एक पद्धत आहे. या विचाराच्या लोकांचे शब्द निरनिराळे असतील पण त्यांचा आशय मात्र सारखा आहे. मुलगी असो की बाई असो तिने आपले घराचे व्यवस्थापन सांभाळत घरात बसायला हवे. तसा करारच असतो. पुरुषांनी घराबाहेर पडून कमायी करावी आणि महिलांनी घरातले काय हवे नको ते सांभाळावे.  यात काही गडबड झाली की असे प्रकार घडणारच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत आणि  आसाराम बापू हे असा विचार करणारांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे म्हणणे पूर्णपणे टाकावू आहे असे आपण म्हणू शकणार नाही. कारण केवळ महिलांतच नाही तर पुरुषांतही स्वैराचार, भोगवाद वाढला आहे. त्याचे काही परिणाम आपण भोगत आहेत.

समाजातल्या सर्व वर्गातल्या जाणकारांच्या मनात भोगवादातून निर्माण झालेल्या वातावरणाविषयी चिंता आहे. भ्रष्टाचारही त्यातूनच निर्माण झाला आहे. सर्वांना हा विचार मान्य होईलच असे नाही. पण, कोणत्याही प्रकारे महिलांना पुन्हा एकदा उंबरठ्याच्या आत ढकलण्याचा विचार कोणी मांडत असेल तर तो झिडकारलाच पाहिजे. बलात्कार होतात म्हणून मुलींना शाळेत घालू नका, मुली शिकल्या की स्वैराचारी होतात, त्यांचे चारित्र्य खराब होते, त्या पुरुषांना दुरुत्तरे करायला लागतात, त्या पुरुषांच्या बरोबरीचे हक्क मागायला लागतात म्हणून त्यांना शिकवू नका असे म्हणणारे महाभाग या समाजात काही कमी नाहीत. मुलींवर बलात्कार होतात म्हणून आपण अशा या जुन्या विचाराच्या लोकांचे सगळेच म्हणणे मान्य करणार नाही.

महिला घराबाहेर पडली पाहिजे. तिने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. तसे ती करीत आहे. अशा घराबाहेर पडलेल्या सगळ्याच महिला काही चारित्र्यहीन नाहीत. या महिला घराबाहेर पडल्या म्हणजे स्वैराचारी झाल्या असे काही दिसत नाही. तसे म्हणणारे लोक अजूनही महात्मा फुले यांच्या कार्याला विरोध करणार्याा त्या काळातल्या सनातनी मंडळींच्याच भाषेत बोलत आहेत. घराबाहेर पडलेल्या काही महिला आणि मुलींवर नको तो प्रसंग येतो हा काही त्या मुलीच्या घराबाहेर पडण्याचा परिणाम नाही. तो समाजातली सुरक्षा व्यवस्था चांगली नसल्याचा परिणाम आहे.

पूर्वी महिला घराबाहेर पडत नसत तेव्हाही त्या सुरक्षित नव्हत्या. उंबरठ्याच्या आत राहणार्या  सुरक्षित, चूल आणि मूल यांच्या पलीकडे न पाहणार्या  महिलांनाही पळवून नेले जात होते. तेव्हा या गोष्टी विचारात घेऊन काही तरी वास्तव विचार मांडायला हवेत. अशा मोठ्या लोकांनी वरवर विचार करून असे बोलता कामा नये. त्यांच्या अशा वक्तव्याचा विचार करताना आणखी एक गोष्ट जाणवते की, त्यांना आपण कोणत्या क्षणी कोणता विचार मांडला पाहिजे याचे तारतम्य नाही. वेळ कोणती आहे आणि आपण काय बोलत आहोत याचे भान नाही. दिल्लीतल्या  घटनेने देशाला धक्का बसला आहे. सारा देश त्या मुलीच्या मृत्यूने शोकात आहे आणि आता हे विचारवंत त्या मुलीला दोष देणारी विधाने करत आहेत. त्यांना काळ वेळही समजत नाही.

Leave a Comment