अमिताभ आणि कसाब हे बाहुले: निदा फाजली

मुंबई: ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन आणि रक्तपिपासू दहशतवादी अजमल कसाब हे दोघेही दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे बाहुले आहेत; या शब्दात केलेल्या अस्थानी तुलनेने ज्येष्ठ शायर आणि गीतकार निदा फाजली यांनी वादाचे वादळ आपल्या अंगावर ओढवून घेतले आहे. त्यांच्या या तुलनेने ज्येष्ठ साहित्यिकांसह सर्व स्तरातून फाजली यांच्यावर कठोर टीका होत आहे.

एका साहित्यविषयक नियतकालिकात फाजली यांनी लिहिलेल्या पत्रात ‘बिग बी’ यांची तुलना थेट कसाबशी केली आहे. कसाबला लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद याने घडविले; तर अमिताभ यांच्यातील अँग्री मॅन सलीम जावेद या लेखकांच्या लेखणीतून घडला. असे फाजली यांनी या पत्रात नमूद केले आहे. अँग्री यंग मॅन ला केवळ ७०व्या दशकापुरते मर्यादित कसे ठेवता येईल; असा सवाल करून फाजली पत्रात पुढे म्हणतात की; सध्याच्या काळात तर ७० च्या दशकापेक्षाही अधिक संताप समाजात गरजेचा आहे. मग एकट्या अमिताभला अँग्री यंग मॅन म्हणून गौरविण्यात काय हशील? तो तर कसाबप्रमाणे दुसऱ्याच्या हातातील बाहुले आहे; असेही फाजली यांनी नमूद केले. बाहुल्याला तर फासावर चढविले गेले. मात्र बाहुले खेळविणाऱ्याला पाकिस्तानने का जिवंत सोडले; असा सवालही त्यांनी कसाबसंदर्भात केला आहे.

हे पत्र प्रसिद्ध होताच उर्दू साहित्य क्षेत्रात वादळ निर्माण झाले आहे. लेखक असगर वजाहत यांनी फाजली यांच्या विधानाला मूर्खपणाचे आणि हास्यास्पद असल्याचे मत व्यक्त केले. कवी असद यांनी मात्र फाजली यांचे समर्थन केले. अमिताभ यांनी ७० च्या दशकात निभावलेल्या अनेक भूमिका लोकशाहीविरोधी आणि सध्याच्या दहशतवाद्यांच्या जवळ जाणाऱ्या आहेत. समाजानेही त्यांना ‘हिरो’ म्हणून मान्यता दिली; अशी खंत असद यांनी व्यक्त केली.

Leave a Comment