अजागळ स्तुती

माणसाला थोडीही चुकीची टीका केलेली आवडत नाही पण चुकीची स्तुती कितीही करा ती आवडायला लागते. माणूस चुकीची टीका करणारांना टीका न करण्याबाबत बजावतो पण कोणी चुकीची स्तुती करायला लागले की तो ती करणाराला प्रोत्साहन देतो. त्या स्तुतीच्या प्रवाहात वाहून जाणे त्याला आवडते. नरेन्द्र मोदी अशा प्रवाहात सध्या वाहून जायला लागले आहेत आणि त्यांची ही खोड माहीत असलेले अनिल अंबानी सारखे मतलबी धंदेवाले त्यांना मिठ्या मारून त्यांना सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांच्या पंक्तीला बसवायला लागले आहेत. नरेन्द्र मोदी यांनी तिथली विधानसभेची निवडणूक सलग तीनदा जिंकली आहे.

कोणालाही चांगले यश मिळाले की त्याचे अभिनंदन करणे हे सभ्यपणाचे लक्षण आहे. त्यानुसार विधानसभेची निवडणूक होऊन निकाल जाहीर झाले तेव्हा त्यांच्यावर  अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्यांच्या प्रशासन कौशल्याची वाहवा झाली. हे सारे खरे आहे पण त्यांनी असा काय पराक्रम केला आहे की ज्यामुळे त्यांना महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या मांदियाळीत नेऊन बसवले जात आहे ? येऊन जाऊन मोदी यांनी राज्यात मोठी गुंतवणूक घडवली आहे एवढेच ना ? तसे तर महाराष्ट्रात त्यापेक्षा किती तरी अधिक गुंतवणूक झाली आहे आणि महाराष्ट्रातही सरकारने विजयाची हॅटट्रीक केली आहे. उलट महाराष्ट्रातली गुंतवणूक आणि गुजरातची गुंतवणूक यात किती तरी मोठे अंतर आहे.

मोदी यांचे एक वैशिष्ट्य आहे. ते जाहीरात चांगली करतात. लोकशाहीत आणि मुक्त अर्थव्यस्थेच्या या वातावरणात केवळ चांगले काम करून भागत नाही. तर ते चांगले करीत आहोत हे जगाला दाखवून द्यावे लागते. मोदी यांनी आपले मार्केटिंग चांगले केले आहे. त्यामुळे त्यांच्या छोट्या कामाचा गवगवा झाला. मोदी यांच्या गवगवा करण्याच्या सवयीने सामान्य माणसाला ते विकास पुरुष वगैरे वाटत असतील पण अनिल अंबानी यांना ते सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांच्याएवढे वाटत असतील तर  या उद्योगपतीच्या हेतूची तपासणीच करायल हवी आहे. शेवटी व्यापारी असेच असतात. काही प्राप्त करायचे असले की समोरच्या माणसाला मधाळ शब्दांत असे काही घोळून काढतील की तो भाळलाच पाहिजे. मोदी यांना तरी या मधाळ शब्दांची भुरळ पडली आहे असे दिसते. ते बिचारे पंतप्रधानपदावर डोळा ठेवून वाटचाल करायला लागले आहेत. त्यांना अशा स्तुतीची गरजच आहे. त्यांची कोणाशीही तुलना केली तरी ते तिचा स्वीकारच करतील.

अनिल अंबानी हे कदाचित असेही म्हणतील की आपण मोदी यांची स्तुती करीत आहोत यात काही खोटे नाही. तसे असेल तर मात्र त्यांना महात्मा गांधी आणि सरदार पटेल हे कोण आहेत हे माहीत नाही असे म्हणावे लागेल. त्यांच्या माहितीसाठी असे सांगावेसे वाटते की, महात्मा गांधी यांना जगाने  अॅरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस अशा जगातल्या मोठ्या विचारवंतांच्या यादीत समाविष्ट केले आहे. सरदार पटेल यांनी तर बिस्मार्क ऑफ इंडिया असा बहुमान मिळवला आहे.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा या देशाचे स्वरूप आपण आज पहात आहोत तसे नव्हते. या देशात ६०० संस्थाने होती. ती भारतात आली नसती तर आपल्या देशाचे आताचे स्वरूप आपल्याला पहायला मिळाले नसते. या सगळ्या संस्थांनाना भारतात विलीन होण्यास पटेलांनी भाग पाडलं. या निमित्ताने त्यांनी आपल्या नेतृत्व गुणांचे जे दर्शन घडवले ते केवळ असामान्य होते. अनिल अंबानी यांनी चवली पावलीच्या स्वार्थासाठी आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करून मोदी यांना  या दोन महापुरुषांच्या मांदियाळीत बसवणे हा या दोघांचा घोर अपमान आहे. म्हणून काँग्रेस पक्षाने अंबानी यांना या स्तुतीबद्दल फैलावर घेतले आहे. ते योग्यच आहे.

असे असले तरी काँग्रेसच्या नेत्यांना अशा अवास्तव स्तुतीचे अगदीच वावडे आहे असे काही म्हणता येत नाही. या पक्षाच्या अध्यक्षांनी, देवकांत बरुआ यांनी  इंदिरा गांधी यांची स्तुती करताना, इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया असे म्हटले होते. अजून एका मोठ्या नेत्याने संजय गांधी यांना प्रति विवेकानंद म्हटले होते.  आताही काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी मोदी यांची तुलना हिटलरशी केली आहे. आता उद्योगपती मोदी यांची जशी स्तुती करीत आहेत तशीच जर्मनीतले भांडवलदार  हिटलरची स्तुती करीत होते. याची आठवण मनिष तिवारी यांनी करून दिली आहे.

एखाद्या माणसाची स्तुती उद्योगपतींनी केली की तो हिटलर होतो असा हा नवा शोध सर्वांना चकित करणारा आहे. अगदी हिटलरही हा शोध ऐकून चकित होऊन तोंडात बोटे घालत असेल. भारतात तर कोणी हिटलर झालेला नाही. इंदिरा गांधी यांनी हिटलरशाही कशी असते हे आणीबाणीत दाखवून दिले होते. पण त्या आधी उद्योगपतींनी त्यांची स्तुती केलेली नव्हती. हिटलरशी तुलना करायचीच तर त्याचा कट्टर सहकारी बेनिटो मुसोलिनी याच्याशी करता येईल. त्याने आपल्या देशाला हुकूमशाहीत लोटले होते. तो मुसोलिनी सोनिया गांधी यांच्या माहेरचा म्हणजे इटलीचा होता.

Leave a Comment