सीमेवर वाढता तणाव: पाक सैन्याकडून पुन्हा गोळीबार

नवी दिल्ली: पाकिस्तानी सैन्याची मुजोरी अद्यापही सुरू असून शुक्रवारी पाक सैनिकांनी सरहद्दीवरील पाच भारतीय लष्करी ठाण्यांवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सीमेवरील वाढत्या तणाव परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री ए. के एन्थोनी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन आणि लष्कर प्रमुख जनरल विक्रमसिंग यांची भेट घेतली. पाकिस्तान सरकारनेही भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त शरथ सभरवाल यांना पाचारण करून भारताकडून पाकिस्तानी सैन्यावर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. गुरुवारी भारतीय सैनिकांच्या गोळीबारात एक पाक सैनिक ठार झाल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे.

पाक सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडून दोघा भारतीय सैनिकांची हत्या आणि त्यांच्या देशाची विटंबना; या संदर्भात भारतीय सैन्यदलात संतापाची लाट पसरली आहे. विशेषत: दोघे शहीद जवान ज्या बटालियनचे होते त्या राजपुताना रायफल्सच्या जवानांनी सलग ३ दिवस जेवण न करून आपला संताप आणि दु:ख प्रकट केले आहे. पाक सैन्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी या जवानांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण केला जात आहे. त्यातंच पाक सैन्याने गुरुवारी पुन्हा नियंत्रण रेषेपलिकडून पूंछ आणि कृष्णाघाटी या ठिकाणी भारतीय सैन्यावर गोळीबार केल्याने सीमेवरील तणावात भर पडली आहे.

पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी दोन भारतीय जवानांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. सैनिकांच्या विटंबनेचे कृत्य पाक सैनिकांकडून झाल्याचा पाकिस्तानने इन्कार केला आहे.आमच्या दोघा साथीदारांना पाक सैनिकांनी निर्घृणपणे ठार केले नाही; मात्र आम्ही काहीच करू शकलो नाही; अशी सैनिकांची भावना आहे. या प्रकाराबद्दल पाक सैनिकांवर सूड उगविण्याची आमची इच्छा आहे. मात्र त्यासाठी वरिष्ठांचे आदेश आवश्यक आहेत; असेही पूंछ विभागातील सैनिक बोलून दाखवितात. यावर सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहानुभूती व्यक्त केली. सैनिकांच्या मनात असलेला रोष स्वाभाविकंच आहे. आम्हीही त्यांना या घटनेचा बदला निश्चित घेतला जाईल; असा विश्वास देत आहोत. मात्र फक्त हे कधी करायचे; हे सांगण्याचे मात्र आम्ही टाळत आहोत; असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान; सेनादलाच्या वरिष्ठ पातळीवरही या घटनेबाबत विविध घडामोडी सुरू आहेत. या घटनेबाबत सैन्यदलाकडून चौकशी सुरू आहे. पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषा ओलांडून ६०० मीटर आतमध्ये कसे घुसले आणि दोन सैनिकांची हत्या करून; इतकेच नव्हे तर त्यांच्या मृतदेहाची विटंबना करून पुन्हा सुखरूप परत कसे गेले; याबाबत लष्कराच्या उत्तर विभागाचे वरिष्ठ अधिकारी कसोशीने तपास करीत आहेत. या संदर्भात राजौरी येथे लष्कराच्या २५ व्या डिव्हिजनच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ़्ट. जनरल के. टी. पटनायक आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

दरम्यान; भारत, पाकिस्तान दरम्यान दर सोमवारी पूंछ ते रावळकोट बससेवा पाकिस्तानने बंद केली आहे. या बंदीचे अधिकृत कारण पाक अधिकर्‍यांकडून देण्यात आले नसले तरीही सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊनंच ही सेवा बंद करण्यात आल्याचे निश्चित आहे. भारतातून पाकिस्तानात किराणा माल आणि ग्राहकोपयोगी वस्तू घेऊन जाणारे ट्रकही पाक सैन्याने गुरुवारी वाटेतंच अडवून त्यांना पाकिस्तानात येण्यास बंदी केली आहे. त्यामुळे भारतीय व्यापर्‍यांचे सुमारे सव्वा करोड रुपयांचे नुकसान झाले आहे.