मुंबई, दि.११ – थायलंडबरोबर झालेल्या मुक्त व्यापार करारामध्ये सोन्याच्या व्यापाराचा समावेश केंद्र सरकारने न केल्याबद्दल, अखिल भारतीय जेम्स अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने सरकारचे अभिनंदन केले. मुक्त व्यापार करार झालेल्या देशांतून मोठया प्रमाणावर सोन्याचे दागिने देशात येण्याची भीती आहे. असे झाल्यास नाहक दरवाढ होण्याचीही शक्यता असते. हे टाळण्यासाठी मुक्त व्यापार करारांतर्गत येणार्याा वस्तुंमध्ये सोन्याचा समावेश करू नये, असे आवाहनही फेडरेशनने केले आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष बच्चराज बामलवा म्हणाले की, केंद्र सरकारच्या अर्थ खात्यासाठी सोने हा अत्यंत महत्वाचा धातू आहे. त्यामुळेच सोन्याच्या व्यापारावर सरकारचे लक्ष असणे स्वाभाविक आहे. म्हणूनच मुक्त व्यापार करारातून सोने वगळल्यामुळे सोन्याच्या व्यापारात समतोल राहील. सोन्याच्या अतिआयातीमुळे देशभरातून बाहेर जाणारे चलन वाचविण्यासाठी फेडरेशनने काही उपाय सरकारला यापूर्वी सुचविले आहेत. यात देशातील लोकांकडे असलेले सोने चलनात आणणे, सोन्याच्या ऐवजांच्या वापरातील पुनरावृत्ती कमी करणे किवा पूर्वी घेतलेल्या सोन्याचा पुर्नवापर कमी करणे, सोन्याचा साठा कमी करणे यासारखे उपाय आहेत. जेम्स अॅण्ड ज्वेलरी क्षेत्राची वाढ होऊन देशाच्या परकीय चलनात भर घालता यावी, यासाठी या क्षेत्राविषयी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन फेडरेशनने केले आहे.