वाराणसी – एक ऐतिहासिक शहर

वाराणसी, काशी, बनारस अशी अनेक नांवे असणारे उत्तर भारतातले हे ऐतिहासिक शहर हिंदू लोकांचा स्वर्ग मानले जाते. पवित्र गंगा नदी अनेक शहरांतून वाहात असली तरी वाराणसी म्हणजे गंगेचे शहर अशीही या शहराची ओळख आहे. कारण येथल्या गंगाकिनारी मृत्यू आल्यास अथवा दहन केले गेल्यास मोक्ष मिळतो अशी हिंदू धर्मियांची दृढ श्रद्धा आहे. हजारो वर्षांच्या इतिहास असलेले हे शहर अनेक गल्ल्याबोळ, गंगेकाठी बांधलेले असंख्य घाट, घाटावरची शेकडो मंदिरे आणि सूर्योदयाला गंगेत उभे राहून सूर्याला अर्घ्य देणारे शेकडो भाविक पाहण्यासाठी अवश्य भेट द्यावी असे ठिकाण आहे. तर्कविर्तक बाजूला ठेवून येथे अजोड श्रद्धेने आलेले भाविक हेही पाहण्यासारखे दृष्य असते. जगभरातून भारतभेटीवर येणारे पर्यटकही वाराणसीला भेट दिल्याशिवाय परतत नाहीत असे याचे महत्त्व आहे.
Varanasi
थंडीत असह्य थंडी आणि उन्हाळ्यात भाजून काढणारा उन्हाळा असे विषम हवामान असलेल्या या शहराला भेट देण्यासाठी आक्टोबर ते मार्च हा काळ सर्वात चांगला. वाराणसी पवित्र स्थळ असल्याने येथे जाण्यासाठी सर्व मार्ग म्हणजे रस्ते, विमान आणि रेल्वे मोठ्या संख्येने आहेत. मात्र शहरात फिरताना अरूंद गल्याबोळ असल्याने रिक्षा सोयीची ठरते. वाहतूक कोंडी हा इथला नित्याचा प्रकार
Varanasi3
वाराणसीचे विश्वनाथ मंदिर हे गोल्डन टेंपल म्हणून ओळखले जाते. या मंदिरावर मुघल सम्राटांनी अनेक आक्रमणे केली. दहशतवाद्यांच्या लिस्टवर असल्याने आजही येथे कडक सुरक्षा व्यवस्था असून बॅग, पेन, कॅमेरे आत नेऊ देत नाहीत.जेवढे वेळा हे मंदिर उध्वस्त केले गेले तेवढे वेळा हिंदू राजांनी ते पुन्हा बांधले. दारात काळभैरव मंदिर असून काळभैरव म्हणजे शिवाचेच रूप मात्र ते मृत्यूचे प्रतीक मानले जाते. येथे मिळणारा काशीचा गंडा गळ्यात, हातात बांधायची प्रथा असून काशीयात्रा करणारे आपल्या नातेवाईकांसाठीही आवर्जून हे गंडे घेऊन येतात. वाराणसीत असंख्य देवळे आहेत. दुर्गा मंदिर, तुळशीमानस मंदिर, मनमंदिर ही कांही महत्वाची देवळे. त्याचबरोबर वेधशाळा आणि बनारस हिंदू विद्यापीठ आवर्जून भेट द्यावे असे. विद्यापीठाचा हिरवागार ,शांत परिसर मनाला भुरळ घालणारा. स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात हे विद्यापीठ पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जात होते. आशियातील सर्वात मोठे निवासी म्हणजे रेसिडेन्शियल विद्यापीठ असलेल्या या विद्यापीठात १२४ स्वतंत्र विषयांचे विभाग आहेत.

Varanasi1

वाराणसीपासून १३ किमीवर असलेले सारनाथ हे बौद्धधर्मियाचे पवित्र स्थळ असून येथेच बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली असे मानले जाते. येथेच गौतमबुद्धाने आपल्या अनुयायांना पहिले प्रवचन दिले. हे ठिकाण डिअर पार्क म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी अनेक आशियाई देशांनी त्यांच्या पारंपारिक वास्तूशैलीतील बुद्धमंदिरे बांधली आहेत. वाराणसी सोडण्यापूर्वी काशीविश्वेश्वराची बहीण गौरीमाता हीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
Varanasi2
काशीमधले गंगेवर बांधले गेलेले घाट हे या शहराचे आणखी एक वैशिष्ठ. मनकर्णिका, पंचगंगा, दशावमेध, केदार, नारद आणि राजा हरिश्चंद्राने जेथे आपल्या मुलावर अंत्यसंस्कार केले तो हरिश्चंद्र घाट, हनुमान घाट असे अनेक घाट येथे आहेत. मात्र यातील अनेक घाटांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याने तेथे कमालीची घाण असते. त्यामुळे गंगेतून नौकाविहार करताना हे घाट पाहणे सोयीचे ठरते. दिवाळी आणि शिवरात्रीला विश्वेश्वर मंदिराची विशेष सजावट केली जाते. घाटावर केली जाणारी गंगेची आरती चुकवू नये अशी. नास्तिकालाही भावनाविवश करणारा हा सोहळा असतो. वाराणसीत गंगेत स्थान करण्यासाठी येणार्यांाची दररोजची संख्या ६० हजारांपेक्षा जास्त असते असे सांगतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्यावेळी गंगेतून केलेला नौकाविहार अवर्णनीय आनंदाची अनुभूती देणारा.

वाराणसीला जायचे म्हणजे बनारसी शालू खरेदी हवीच. येथील सिल्क फार प्रसिद्ध आहे मात्र फसवाफसवीही खूप होते त्यामुळे खरेदी काळजीपूर्वक करावी हे बरे. नैसर्गिक तेले, परफ्यूम्सही येथे चांगले मिळतात. आलू चाट, पाणीपुरी, लस्सी रबडी, मिठाई अशी खादडीचे अनेक पदार्थ स्वच्छतेच्या कल्पना बाजूला सारून खाता आले तर अवश्य चाखावेत. काशीला भेट दिल्यानंतर परतताना बाकी कांही आणा वा आणू नका पण गंगेचा गडू आवर्जून सोबत आणावा. आपल्या सुह्यदांच्या मुखात अंत्यसयमी गंगाजल घालता यावे अथवा तशी वेळ आली नाही तर आपल्या अंत्यसमयी तरी गंगाजल मुखात घेऊन न परतीच्या यात्रेला जाता यावे यासाठी गंगेचा गडू हवा नाही का?

Leave a Comment