बर्निंग स्पॉट धुळे

गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातले धुळे शहर जातीय दंगलीने होरपळून निघाले. महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली होत नाहीत असे नाही. अनेक ठिकाणी त्या होतात. त्याबाबतीत मालेगाव, भिवंडी या शहरांची नावे वारंवार घेतली जातात. मालेगावमध्ये पूर्वी गणेश उत्सवाच्या काळात शांतता राहीलच याची खात्री देता येत नसे. इतके ते गाव अशांत होते. भिवंडीमध्ये सातत्याने अशांतता नव्हती. परंतु २५ वर्षापूर्वी भिवंडीत झालेल्या जातीय दंगलीमध्ये ३०० पेक्षाही अधिक लोक मारले गेले होते आणि त्यामुळे भिवंडीचे नाव जातीय दंग्यांच्या यादीत आघाडीवर होते.

१९९२ आणि ९३ अशी दोन वर्षे मुंबईने तर महाभीषण जातीय दंगली पाहिल्या. त्यानंतरच्या काळात पुणतांबे, धुळे, जळगाव, औरंगाबाद, सोलापूर अशा शहरांची नावे जातीय दंग्यासाठी प्रसिध्द शहरे म्हणून घेतली जायला लागली. २००२ साली सोलापुरात मोठी दंगल होऊन ७ जण मारले गेले आणि दुकानांची प्रचंड जाळपोळ झाली. परंतु नंतर मात्र सोलापूर शांत झाले. अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरांमध्ये मोठी जातीय दंगल झाली नाही. छोट्या मोठ्या कुरबुरी झाल्या असतील परंतु संचारबंदी लागू करावी अशी दंगल कोठेही झाली नाही.

या शांततेला धुळे मात्र अपवाद आहे. २००८ साली धुळ्यामध्ये जातीय दंगल झाली आणि तिची व्याप्ती एवढी मोठी होती की अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. शहराचा बराच मोठा भाग दंगलीच्या ज्वाळांनी होरपळून निघाला आणि या भीषण अनुभवामुळे यापुढे लोक शांतता पाळतील अशी आशा वाटायला लागली. कोणत्याही मानवनिर्मित विध्वंसाचा असा कडेलोट झाला की त्यातून लोकांना पश्चात्ताप होतो आणि लोक दंगलीसाठी रस्त्यावर उतरायला कचरतात. त्यातून दंगली आपोआप थांबतात असा इतिहासाचा धडा आहे.

परंतु २००८ सालच्या धुळ्याच्या दंगलीने हा सिध्दांत चुकीचा ठरविला आहे. २००८ साली प्रचंड होरपळ झाली असतानासुध्दा या शहरांतल्या दोन्ही जमातींच्या लोकांच्या मनात बदल्याची आग धुमसत राहिली आणि त्यामुळे छोटे मोठे निमित्त मिळण्यास उशीर की लगेच हे मोठे शहर आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले. एखाद्या शहरात दंगल झाली की तिच्या कारणांचा शोध घेतला जातो आणि असे लक्षात येते की प्रत्यक्षात दंगलीला फार छोटे कारण असते. मात्र ती असे काही भीषण स्वरूप धारण करते की एवढ्या कारणावरून एवढी मोठी आग का लागली याचे आश्चर्य वाटते.

धुळ्यामध्ये झालेली गेल्या आठवड्यातली दंगल ही एका हॉटेलमध्ये खाण्यापिण्याच्या बिल देण्यावरून झालेल्या वादातून पेटली. हॉटेलचा मालक आणि एक रिक्षा चालक या दोघांतले हे भांडण एवढे पेटले की दोन्ही जमातींच्या लोकांनी परस्परांवर दगडफेक आणि शस्त्रांचे हल्ले सुरू केले. दुकानांच्या जाळपोळीस प्रारंभ झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केला, दंगलखोरांवर लाठीमार केला तरीही दंगेखोर आटोक्यात आले नाहीत. त्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि त्यांचाही उपयोग झाला नाही त्यामुळे गोळीबार केला. त्यात पाचजण ठार झाले. २०० लोक जखमी झाले. त्या २०० जणांत गोळीबारामुळे जखमी झालेल्यांचीही संख्या मोठी आहे आणि दगडफेकीत जखमी झालेल्यांत ९५ पोलिसांचा समावेश आहे. हे सारे आकडे चक्रावून टाकणारे आहेत. दुकानांच्या जाळपोळीमध्ये नेमके किती कोटी रुपयांचे नुकसान झाले याचे पंचनामे अजून व्हायचे आहेत. परंतु हे नुकसान निश्चितपणे काही अब्ज रुपयांत आहे. हे सारे हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या भांडणातून घडले. वरवर पाहिले असता ही गोष्ट चमत्कारिक वाटते. पण त्याच्या मागच्या मानसिकतेवर लक्ष दिले पाहिजे.

या दोन सामान्य माणसामध्ये झालेले भांडण ही तर ठिणगी होती पण तिचे रुपांतर आगीत व्हावे यासाठी आवश्यक अशी अविश्वासाची स्फोटक सामुग्री आधीच जमा झालेली होती. हिंदू आणि मुस्लीम हे दोन समाज अशा दंगली समोरासमोर उभे असतात. आपल्यावर मुस्लिमांचा कधीही हल्ला होईल अशी भीती हिंदूंना वाटते आणि हिंदू आपल्यावर हल्ला करतील अशी भीती मुसलमानांना वाटते. या भितीतूनच दोन्ही बाजू दंगलीसाठी आवश्यक अशा सामुग्रीची जमवाजमव करतात. दोन्ही समाजांचा स्वतःहून पहिल्यांदा हल्ला करण्याचा विचार नसतोच. कारण दंगल कुणालच नको असते.

एकदा दंगल पेटली की दोन्ही बाजूंचे नुकसान होत असते. म्हणून दंगल दोन्ही बाजूंना नकोच असते. पण त्यांनी पलीकडून हल्ला झाल्यास आपण तयार असले पाहिजे या सरंक्षणाच्या भावनेतून आणि अविश्वासातून प्रतिकाराची तयारी केलेली असते. एखादी ठिणगी आणि गैरसमज निर्माण झाला की सामुग्री असतेच ती वापरली जाते. म्हणून त्या सामुग्रीच्या संकलनाला कारणीभूत ठरणारी अविश्वासाची मानसिकता संपवली पाहिजे. भिवंडी येथे काम केलेले पोलीस आयुक्त सुरेश खोपडे यांनी ही गोष्ट हेरून भिवंडीच्या हिंदू मुस्लीम अशा दोन्ही समाजात विश्वास निर्माण केला होता. कोणी कोणावर हल्ला करणार नाही याची दोघांनाही खात्री पटली आणि शेवटी भिवंडीतल्या दंगली थांबल्या. धुळ्यामध्ये हे घडले पाहिजे.

Leave a Comment