‘धूमपान करा आणि आरोग्यसंपन्न व्हा!

‘पुणे: ‘धूम्रपान करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे;’ हा वैधानिक इशारा आणि ही भीती आणखी गडद करणारे कर्करोगाचे निदर्शक असलेले विंचवाचे चित्र या गोष्टी कोणत्याही सिगरेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांच्या वेष्टनावर असणे बंधनकारक आहे. मात्र याच्या अगदी उलटा; म्हणजे ‘धूमपान करा आणि आरोग्यसंपन्न व्हा;’ असा संदेश देणाऱ्या तंबाखूविरहीत, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून सिगरेट्स बनविण्याचे तंत्र डॉ. राजस नित्सुरे या तरुण वैद्यकीय संशोधकाने पूर्णत्वास नेले आहे. आयुर्वेदिक ‘सिगरेट्स’चे उत्पादन व्यावसायिक पातळीवर सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

जगात प्रामुख्याने ज्या धूम्रपानाचे व्यसनात रुपांतर होते ते धूम्रपान म्हणजे तंबाखूचे धूम्रपान! विदेशात अनेक ‘हर्बल सिगरेट्स’ विकल्या जातात. त्यामध्ये काही औषधी वनस्पतींचा अंतर्भाव असतो. मात्र त्यातही तंबाखू असतेच. प्राचीन भारतीय वैद्यक परंपरेत; आयुर्वेदात औषधी वनस्पतींमधील उपयुक्त घटक शरिरात पोहोचविण्यासाठी धूम्रपानाचा उपयोग केला जात असे. मात्र अशा वैद्यकीय कारणासाठी, उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या धूम्रपानाला ‘धूमपान’ अशी संज्ञा वापरल्याचे उल्लेख आयुर्वेदात आढळतात. अर्थात परंपरेनुसार हे धूमपान तोंडाद्वारे करण्याऐवजी नाकाद्वारे करण्यावर शास्त्रकारांचा भर आहे.

डॉ. नित्सुरे यांनी या प्राचीन परंपरेलाच आधुनिकतेची जोड देऊन आयुर्वेदिक सिगरेट विकसित केली आहे. ‘आजीबाईच्या बटव्या’तील पुदिना, तुळस, ज्येष्ठमध, धमासा (धन्वयास), लवंग, दालचिनी अशा औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींपासून बनलेले पूर्णत: निकोटीनविरहीत आणि टारचे प्रमाण अत्यल्प असलेले धूमपानाचे मिश्रण डॉ. नित्सुरे यांनी विकसित केले आहे. या मिश्रणाची काटेकोर तपासणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. या आयुर्वेदिक सिगरेट्सच्या उत्पादनासाठी वापरला जाणारा कागद, डिंक आणि फिल्टर्सही आरोग्याला अपायकारक नसतील; असे डॉ. नित्सुरे यांनी ‘माझा पेपर’शी बोलताना सांगितले. या उत्पादनाला पेटंट मिळावे यासाठीही त्यांनी अर्ज केला आहे.

या सिगरेट्समध्ये वापरण्यात आलेल्या औषधी वनस्पतींमुळे छातीच्या वरच्या भागातील अवयवांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. विशेषत: कफ साठून राहणे, घशाची खवखव अशा विकारांवर या धूमपानाचा चांगला उपयोग दिसून येतो. आवाज स्वच्छ आणि मोकळा होण्यासाठीही त्याची मदत होते; असा दावा डॉ. नित्सुरे यांनी केला.

आयुर्वेदशास्त्रात संशोधनाची खंडीत अथवा क्षीण झालेली प्रक्रिया पुन्हा गतिमान व्हावी; किमान सरसकट वापरल्या जाणाऱ्या औषधांचे प्रमाणीकरण करण्याची पद्धत अमलात यावी; असा डॉ. नित्सुरे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी आयुर्वेदाच्या पदवीबरोबर औषधनिर्माणशास्त्राची पदविकाही प्राप्त केली आहे. आयुर्वेद चिकित्सा आणि आयुर्वेदिक औषधनिर्मितीला आधुनिक शास्त्राची पक्की बैठक मिळावी यादृष्टीने संशोधन कार्य करीत राहण्याचा डॉ. नित्सुरे यांचा संकल्प आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment