जाधव ‘राष्ट्रवादी’च्या गळाला?

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला आमदार पदाचा राजीनामा मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे आपण राजीनामा मागे घेतला असला तरीही पुन्हा कदापि मनसेत जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यात सध्या मोठा दुष्काळ पडला असून या पार्श्वभूमीवर या भागाची कैफियत मांडणारा आमदार सभागृहात असावा यासाठी पवार आणि वळसे पाटील यांनी दिलेला सल्ला आपण मानल्याचे जाधव सांगत आहेत.

जाधव यांना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीच मारहाण केल्याचे प्रकरण राज्यात गाजले. नंतर पोलिसांनीही त्यांना मारहाण केली आणि तेव्हापासून आतापर्यंत गृह विभाग राष्ट्रवादीकडेच आहे. स्वाभाविकंच जाधव यांचा राष्ट्रवादीवर राग होता. तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सल्ला मान्य करून जाधव यांनी राजीनामा मागे घेण्याचे ‘पडद्यामागील’ कारण काय असावे; याचीच चर्चा सुरू आहे.

जाधव यांना सहकारी साखर कारखाना काढायचा होता आणि त्याला मनसेने मदत केली नाही; हे जाधव यांनी जाहीरपणे सांगितलेच आहे. मग आता साखरेच्या राजकारणात मुरलेल्या पवारांनी सन २०१४ च्या निवडणुकीत १०० आमदारांचे लक्ष्य गाठण्यासाठी साखर कारखान्याचे आमीष दाखवून जाधवांना गळाला लावले की काय; अशीच चर्चा चवीचवीने रंगते आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पैसे घेऊन निवडणुकीत तिकीट देत असल्याचा खळबळजनक आरोप औरंगाबाद येथील कन्नडचे मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. आपल्याला झालेल्या मारहाणीचे प्रकरण मिटविण्यासाठी पक्षाने ‘मांडवली’ केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मनसेत आपली घुसमट होत असल्याचा आरोप करून जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला.

विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देताना पैशाची देवाण घेवाण होत असून त्यामागे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेच आहेत; असा जाधव यांचा दावा आहे. राज ठाकरे यांच्यामुळे प्रभावित होऊन आणि हा नवा पक्ष काही वेगळे करून दाखवेल; अशा आशेने आपण मनसेत गेलो मात्र येथेही ‘मिलीभगत’ असल्याचा अनुभव वारंवार आला. आपल्याला मारहाण करणाऱ्या लोकांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून पक्षात घेऊन त्यांना पदे दिली गेली ती अर्थकारणाशिवाय का; असा सवालही त्यांनी केला.

मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर आणि खुद्द राज ठाकरे यांच्याकडून आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यामुळेच आपण आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देत असून यापुढे अपक्ष निवडणूक लढवू; असेही जाधव यांनी जाहीर केले.

Leave a Comment