झारखंडात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

रांची दि.१० – झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी राजीनामा देऊन विधानसभा भंग करण्याची राज्यपालांना केलेली शिफारस नजरेआड करून झारखंडचे राज्यपाल सैय्यद अहमद यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ही शिफारस मान्य केली गेली तर झारखंडमध्ये १२ वर्षांच्या काळात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची तिसरी वेळ असेल. झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपचा पाठिबा काढून घेतल्यामुळे मुंडा सरकार कोसळले होते.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी झारखंड राज्यपालांची शिफासर मंत्रालयाकडे आल्याचे मान्य केले असून त्यावर विचार करण्यासाठी थोडा अवधी लागेल असे सांगितले आहे. दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते दिल्लीत काँग्रेस नेत्यांबरोबर सत्ता स्थापनेसाठीची चर्चा करत आहेत. झारखंडचे उपमुख्यमंत्री हेमंत सोरेन हे त्यातील मुख्य आहेत. रांचीतील काँग्रेस खासदार व केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनीही राज्यपाल सय्यद यांची भेट घेऊन मुंडा याची विधानसभा भंग करण्याची शिफारस न स्वीकारण्याची विनंती केली होती असेही समजते.