आज पृथ्वीजवळून जाणार राक्षसी उल्का

इजिप्शियन राक्षसाच्या नावावरून ओळखली जाणारी अॅपोफिस ही ९०० फुटी अजस्त्र उल्का आज पृथ्वीच्या जवळून जाणार असली तरी तिचा कोणताही दुष्परिणाम सध्या तरी पृथ्वीवर होणार नाही असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मात्र भविष्यात हीच उल्का पृथ्वीच्या आणखी जवळून म्हणजे अवघ्या ३० हजार मैलांवरून जाणार आहे तेव्हा मात्र जाणवण्यासारखे परिणाम होतील असेही शास्त्रज्ञांना वाटते.

आज ही उल्का पृथ्वीपासून ९ दशलक्ष मैलांवरून जाणार आहे. त्यामुळे भविष्यात ही उल्का पृथ्वीवर धडकणार असेलच तर ती किती नुकसान करेल याची निरीक्षणे करण्याची संधी संशोधकांना मिळणार आहे. २०२९ साली ही उल्का ३० हजार मैलावरून जाणार आहे त्यामुळे ती त्यावेळी संदेश दळणवळण करणार्याक उपग्रहांच्या कक्षेत शिरणार आहे. उल्का पृथ्वीजवळून जाताना नागरिक स्काय वॉच सर्विस या वेब बेस्ड सर्विस च्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहू शकणार आहेत असे संस्थेचे अध्यक्ष पॅट्रीक यांनी नमूद केले आहे. ही वॉच सर्विस जगभरातील वेधशाळांकडून प्रतिमा गोळा करत असते.

पॅट्रीक म्हणाले की पृथ्वीजवळून सततच उल्का जात असतात मात्र गेली कांही वर्षे अॅपोफिसची चर्चा जगभरात सर्वाधिक होत आहे कारण ती २०२९ साली पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. नासातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार ही उल्का पृथ्वीवर आदळलीच तर ५०० मेगाटन टीएनटी स्फोटाएवढी उर्जा निर्माण होईल. त्यामुळे पृथ्वीवर आतंक माजू शकेल. तुलना करायची तर सोविएत झार बॉम्बा हा मोठा हैड्रोजन बॉम्ब फोडला गेला तर ५७ मेगाटन उर्जा निर्माण होणार आहे. मात्र या उल्केमुळे निर्माण होणारी उर्जा त्याच्या दहापट अधिक असेल.