भारतात मोबाईल टॉवर किरणोत्सर्ग धोकादायक पातळीवर

नवी दिल्ली दि. ९ – मोबाईल टॉवर उभारणीतून होत असलेला किरणोत्सर्ग भारतात धोकादायक पातळीच्या ९००० पट अधिक होत असल्याचे या संबंधी प्रसिद्ध झालेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रति चौ.मीटर ०.५ मिलीवॅट इतका किरणोत्सर्ग सुरक्षित मानला जातो.

बायोइनिशिएटिव्ह या प्रकल्पांतर्गत १० स्वतंत्र देशातील २९ संशोधकांनी ही निरीक्षणे नोंदविली आहेत.२०१२ सालासाठीची ही निरीक्षणे आहेत. यात सहभागी असलेल्या तज्ञांत संशोधक, आरोग्य तज्ञ, शास्त्रज्ञ यांचा समावेश असून भारताबरोबरच स्वीडन, इटली, यूएस, रशिया या देशातील तज्ञांचाही त्यात समावेश होता. असा अहवाल २००७ सालात प्रथम प्रसिद्ध केला गेला होता.

२०१२ सालासाठी केल्या गेलेल्या निरीक्षणात असे आढळले की भारतातील मोबाईल टॉवरमधून होत असलेल्या किरणोत्सर्गाची पातळी ४५० मिलीवॅट इतकी आहे. यासंबंधी पाच नवीन सर्वेक्षणेही करण्यात आली. ही पातळी ०.३ ते ०.५ च्यावर असली तर मुलांना डोकेदुखी, लक्ष केंद्रीत न होणे, विस्कळीत झोप व वागणुकीतील समस्या असा त्रास होतो. प्रौढांतही किरणोत्सर्गाचा वाईट परिणाम होऊन मुलांप्रमाणे त्रास होतातच पण प्रजोत्पादन आणि पुनरूत्पादनावरही त्याचा गंभीर परिणाम होतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment