पंढरपूरच्या विठ्ठलाला १५०० कोटींची देणगी

पुणे दि.९ – कानडा विठ्ठलू असे आपल्या विठोबाला म्हटले जात असले तरी अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या या विठूरायाचे अन्य राज्यातही भक्त आहेत. बंगलोरच्या अशाच एका भाविकांने विठ्ठल मंदिरासाठी १५०० कोटी रूपयांची देणगी देऊ केली आहे. या संबंधी या भाविकाने मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पुण्यात भेट घेऊन चर्चा केली असल्याचे समजते. या बैठकीला उपस्थित असलेल्या विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही देणगी स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्री या भाविकाबरोबर आणखी एक बैठक घेणार असल्याचे व त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.

संबंधित देणगीदार भाविकाने आपले नांव जाहीर केले जाऊ नये अशी विनंती केली आहे. मात्र देणगी देण्यापूर्वी शहर विकास योजनेचा प्रॉपर आराखडा आपल्याला दाखविला गेला पाहिजे अशी अट घातली आहे. या देणगीतून विठूरायाच्या मंदिराचा विकास केला जाणार आहे . येत्या दहा दिवसांतही हे भाविक पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. इतक्या मोठ्या रकमेची देणगी पंढरपूरच्या विठूरायाला प्रथमच दिली जात आहे असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment