धुळे:मुंबई: धुळे येथील दंगलीची कसून चौकशी केली जाईल; अशी ग्वाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली आहे. याबाबत अप्पर पोलीस महासंचालक जावेद अहमद यांच्याकडून दंगलीसंबंधी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल; असे पाटील यांनी राज्य अल्पसंख्य आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाला दिली.
रविवारी दुपारी रेस्टॉरंटच्या बिलावरून कांही तरूणांनी मालकाला केलेल्या मारहाणीतून उसळलेल्या दंगलीने जातीय दंगलीचे स्वरूप दाखल केले आणि त्यात ५ जणांचा बळी गेला. ११० व्यक्ती जखमी झाल्या असून त्यात ४९ पोलिसांचा समावेश आहे. गेल्या पंधरवड्यात धुळे भागात उसळलेली ही दुसरी जातीय दंगल आहे. ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला जात आहे. दंगलीत मरण पावलेल्यांची ओळख पटलेली नाही. २०१४ च्या निवडणुका नजरेसमोर ठेवून दंगल पेटविली गेली असा आरोप केला जात आहे.
मच्छी बाजारात सुरवातीला रेस्टॉरंटमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान दंगलीत झाले आणि शहराच्या अन्य भागात ही दंगल वेगाने पसरली असे पोलिसांकडून समजते. धुळ्यात पोलिसांनी संचारबंदी लागू केली. दंगल आटोक्यात आणण्यासाठी प्रथम पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. मात्र दंगल आटोक्यात येत नाही असे दिसताच गोळीबार करण्यात आला. शहरात राज्यातील सर्व जिल्ह्यातून पोलिसांची जादा कुमक पाठविण्यात आली असून त्यात जलद कृती दलाची पथकेही दाखल झाली आहेत. पोलिसांच्या गोळीबारातच तीन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे.
रविवारी उसळलेल्या या दंगलीत हल्लेखोर अॅसिड, पेट्रोल व केरोसीनचे बॉम्ब घेऊन आले होते असे पोलिसांनी सांगितले.२५ डिसेबरला रावेर येथेही अशीच जातीय दंगल उसळली होती आणि त्यात तीन जण ठार झाले होते असे पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.२००८ नंतर झालेली ही सर्वात भीषण दंगल आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.