देशातील व्यावसायिक वातावरण हेच मोठे आव्हान- रतन टाटा

टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदाची सूत्रे नुकतीच हाती घेतलेल्या सायरस मिस्त्री यांच्यापुढे कोणती आव्हाने आहेत याची यादी मोठी असली तरी नुकतेच या पदावरून पायउतार झालेले रतन टाटा यांच्या मते मात्र देशातील व्यावसायिक वातावरण हेच मिस्त्री यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. टाईम मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रतन टाटा बोलत होते.

ते म्हणाले की, सध्या देशात उद्योग व्यवसायांसाठी जे वातावरण आहे ते १९९१ साली असलेल्या वातावरणापेक्षाही वाईट आहे. सध्याचे नियम अधिक कडक आणि किचकट आहेत. ९१ साली नव्या अर्थव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी धडपडणार्यांकची संख्या कमी होती आज मात्र ही संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. अध्यक्षपदाची आपली २१ वर्षांची कारकिर्द संपवून रतन टाटा नुकतेच निवृत्त झाले आहेत.

टाटा उद्योगसमूह मिठापासून ते सॉफटवेअरपर्यंत अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. देशात वाढत असलेल्या भ्रष्टाचार ही उद्योगजगतापुढे नेहमीच मोठी काळजी होती असे सांगून ते म्हणाले की यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होत असतो. मात्र देशाची वेगाने होत असलेली प्रगती आणि विकास यामुळे या काळजीवर मात करणे शक्य झाले आहे. टेलिकॉम क्षेत्रात टाटा कंपनीवर अनियममितता आणि अवैधतेचे आरोप झाले मात्र तपास पथकांनी केलेल्या तपासानंतर या आरोपांतून आम्हाला क्लिन चीट दिली गेली असल्याचे तसेच या प्रकरणात उलट आमचेच नुकसान झाले असल्याचे रतन टाटा यांनी सांगितले. आम्ही कोणताच अवैध व्यवहार केलेला नाही असेही ते म्हणाले.

अध्यक्षपदाची सूत्रे सोडल्यानंतर आता मोकळे वाटते आहे अशी भावना व्यकत करून रतन टाटा म्हणाले की आता आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करण्यावर अधिक भर देणार आहे. अनेक गोष्टी करायच्या राहिल्या आहेत त्यासाठी आता हा वेळ सार्थकी लावणार आहे.

Leave a Comment