गॅसच्या किमती १३० रूपयांनी भडकणार

केंद्र सरकारने वर्षाला सहा अनुदानित सिलिंडर देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता याच सबसिडाईज्ड किवा अनुदानित गॅसच्या किमती जानेवारी ते मार्च २०१३ दरम्यान तब्बल १३० रूपयांनी वाढविण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गॅस बरोबरच डिझेलच्या किंमतीही महिन्याला दीड रूपयाने वाढविल्या जाणार असून ही वाढ २०१५ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. केरोसिनचे दर लिटरला ३५ पैशांनी किवा तीन महिन्यांनी १ रूपयांनी वाढविले जाणार आहे. दरवाढीचा हा प्रस्ताव देशातील तीन प्रमुख ऑईल कंपन्यांनी सरकारला सादर केला असून कॅबिनेटमध्ये त्यावर अंतिम शिककामोर्तब केले जाणार आहे.

इंडियन ऑईल कंपनी, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन प्रमुख कंपन्यांनी इंधन उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात विकावे लागत असल्याने कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत असल्याचे सरकारला वारंवार कळविले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर डिझेल विकताना कंपन्यांना लिटरमागे ९ रूपये ५० पैसे तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढेपर्यंत या कंपन्यांना गॅस, केरोसीन, डिझेलमध्ये दरवाढ करण्यास सरकारने संमती दर्शविली असल्याचे समजते. त्यामुळेच अनुदानित गॅसचे दर त्वरीत ६५ रूपयांनी वाढविण्यात येणार आहेत तर मार्च ३१ पूर्वी आणखी ६५ रूपये शिवाय व्हॅट अशी दरवाढ केली जाणार आहे. म्हणजेच ३१मार्च पर्यंत गॅसचे दर १३० रूपयांनी वाढणार आहेत.

इतकेच नव्हे तर १ एप्रिल २०१३ पासून दर तीन महिन्यांनी गॅसचे दर ५० रूपयांनी वाढविले जाणार असून ही वाढ २०१४ पर्यंत जारी राहणार आहे असेही समजते

Leave a Comment