कुर्‍हाडीने मुडदे पाडायचे का? रामदास फुटाणे

पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सजावटीसाठी दोन कोटी रुपये हवेतच कशाला, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केला. संमेलनाच्या निमंत्रणत्रिकेत परशुरामाच्या कुर्‍हाडीचा समावेश करून काय मुडदे पाडायचे आहेत काय, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार अनंत गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

फुटाणे म्हणाले की; जागतिक मराठी अकादमीच्या वतीने आम्ही साहित्य संमेलन घेतो. या संमेलनाला साधारणपणे 15 लाख रुपये खर्च येतो. मग साहित्य संमेलनाला कोट्यावधी रुपये कशाला हवेत? सरकारने 25 लाख रुपये दिले, तरी 2 कोटी रूपये केवळ मांडवाचाच खर्च कसा होतो; असा सवाल फुटाणे यांनी केला. संमेलनाला याचे नाव नको, त्याचे नाव नको, असा विरोध करणारे हे कोण; असा सवाल करून बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार, संपादक होते. त्यांना विरोध करणे योग्य नाही. काहीजण बाळासाहेबांना विरोध करतात. पण बाळासाहेबांनी निदान धर्माचे राजकारण केले आणि हे जातीच्या पुढे जात नाहीत आणि स्वतःला पुरोगामी म्हणून मिरवतात; अशी टीकाही फुटाणे यांनी केली.

साहित्यबाह्य शक्तीचे महामंडळावर वर्चस्व आहे. तेच साहित्यिकांचे कौतुक करतात. साहित्यिक साहित्यिकांचे कौतुक करीत नाहीत. राजकारणी आणि समाजातील इतर घटक त्यांचा आदर करतात असे सांगून फुटाणे यांनी; लेखकाने वाचकाशी आणि विचारांशी प्रामाणिक असावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

आमच्या म्हणण्या प्रमाणे बद्ल केले नाही तर आमच्या स्टाईलने उत्तर देऊ अशी भाषा वापरणे लोकशाहीत बसते हे त्या लोकांना कोणीतरी विचारा. संमेलनाचा खर्च मला सांगून कुणी केला नाही. त्याबाबत मला विचारू नये. संमेलनाध्यक्ष म्हणून मी प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर देण्याला बांधिल नाही. अध्यक्षांना गुन्हेगाराच्या पद्धतीने वागविणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

Leave a Comment