सॅमसंगचा तिमाही नफा ८ अब्ज डॉलर्सवर

सॅमसंग इलेक्ट्रोनिक्स या जगातील बलाढ्य मोबाईल व मेमरी चीप उत्पादक कंपनीने नुकत्याच संपलेल्या तिमाहीत तब्बल ८. ३ अब्ज डॉलर्सचा नफा मिळविला असून यात त्यांच्या स्मार्टफोन आणि फॅब्लेटचा मोठा वाटा आहे. एका मिनिटात ५०० हँडसेट विकण्याचा विक्रमही कंपनीने नोंदविला आहे. सॅमसंगच्या स्मार्टफोन गॅलॅक्सी सिरीजची मागणी आजही कायम असून त्यांच्या फॅब्लेटचीही तब्बल ८० लाख युनिट विकली गेली आहेत.

सॅमसंगच्या मोबाईलसाठीच्या फलॅट स्क्रीनना चांगली मागणी असून प्रतिस्पर्धी अॅपल कंपनीकडूनही हे स्क्रीन घेतले जातात. नफा नोंदविण्याचा सॅमसंगची ही सलग चौथी तिमाही असली तरी पाचव्या तिमाहीत कदाचित या विजयी दौडीला थोडा ब्रेक लागेल असा अंदाज तज्ञ वर्तवित आहेत. सीझनल डिमांड कमी झाली आहे आणि स्मार्टफोन बाजारत आलेल्या सॅच्यूरेशन मुळे सॅमसंगची विक्री स्थिर राहील किवा थोडी कमी होईल असे तज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात विकसनशील देशांत सॅमसंगच्या उत्पादनांना चांगली मागणी आहे.

फंड मॅनेजर किम सुंगसो यांनी दिलेल्या माहितीनुसार सॅमसंगने अॅपलच्या आयफोन पाचला विक्रीत मागे टाकले आहे. आयफोन पाचची चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी विक्री झाली आहे. या वर्षातअॅपलने एकच स्मार्टफोन बाजारात आणला तर सॅमसंगने ३७ विविध प्रकारची मॉडेल्स बाजारात आणली आहेत. त्यात हाय एंड स्मार्टफोनपासून लो एंड मॉडेल्सचा समावेश आहे. गॅलॅक्सी एस थ्रीने आयफोन चारला मागे टाकत जगातील बेस्ट सेलिंग स्मार्टफोन अशी ओळख मिळविली आहे. त्यांची १५ दशलक्ष युनिट विकली गेली आहेत. अर्थात गेल्या तिमाहीत गॅलॅक्सी एसथ्रीची १८ दशलक्ष युनिट विकली गेली होती मात्र यंदाच्या तिमाहीतील तूट फॅब्लेटने भरून काढली आहे असेही किम यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment