झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांचा राजीनामा

झारखंड मुक्ती मोर्चाने सत्तेतील भाजप सरकारचा पाठिबा काढून घेतल्यामुळे भाजप सरकार अल्पमतात आले आहे. मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी यामुळे आपला राजीनामा राज्यपालांना दुपारी ११च्या सुमारास सादर केला असून राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याची शिफारसही केली आहे असे समजते. मात्र सध्या तरी झारखंड येथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असा अंदाज तज्ञ वर्तवित आहेत.

झारखंडची स्थापना २००० साली झाल्यानंतर गेल्या बारा वर्षात येथे आत्ताची धरून ११ वेळा सत्तापालट झाला आहे. येथील राजकीय परिस्थिती नेहमीच अस्थिर राहिली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे शीबू सोरेन आणि भाजपचे अजुर्न मुंडा यांनी प्रत्येकी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. आत्ताच्या विधानसभेत भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रत्येकी १८ सदस्य असून एकूण सदस्य संख्या आहे ८१. सोरेन आणि मुंडा यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी दीर्घकाळ सत्तेवर राहणे किंवा आपला कार्यकाल पूर्ण करणे दोघांनाही शक्य झालेले नाही. काँग्रेसचे येथे १३ आमदार असून सोरेन सत्तेवर असेपर्यंत सत्तेवर दावा करणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांचे सोरेन हे राजकीय गुरू मानले जातात

Leave a Comment