मुंबईतील जप्त गुटख्यातून पुण्यात वीजनिर्मिती

पुणे दि.७ -गेल्या वर्षी १६ जुलैपासून महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या गुटख्याच्या कोट्यावधी पाकिटांपासून पुण्यातील वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात वीजनिर्मिती करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. अन्न आणि औषध प्रशासनापुढे या जप्त केलेल्या पाकिटांचे काय करायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला होता, त्यावर हा उपाय योजण्यात आला आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत जप्त करण्यात आलेल्या गुटख्यांवर प्रक्रिया करून ती नष्ट करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रत्येक किलोमागे २६.५० पैसे खर्च मागितला होता. त्यामुळे ८ टन वजनाची ही  पाकिटे नष्ट करण्यासाठी लक्षावधी रूपयांचा खर्च करणे भाग पडत होते. मात्र मुंबईतील अन्नऔषध प्रशासनातील अधिकार्यांरनी या संदर्भात पुणे महापालिका आयुक्तांशी संपर्क केला तेव्हा त्यांनी ही पाकिटे नष्ट करून त्यापासून वीज निर्मिती करण्याची तयारी दाखविलीच पण त्यासाठी कांहीही खर्च मागितला नाही.

मुंबईत प्रथम ही पाकिटे खोल खड्डे खणून पुरून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यासाठीही विविध विभागांकडून अनेक परवानग्या आवश्यक होत्या व त्यामुळे ही प्रकिया लांबत चालली होती असे सहआयुक्त ( अन्न औषध) सुरेश देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले पुणे मनपाने मात्र वाहतूक खर्च करण्याची अट घातली आणि बाकी प्रक्रिया मोफत करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे ११ जानेवारीला पहिला लॉट पुण्यातील प्रकल्पात पाठविला जाणार आहे. हा लॉट १ टनाचा असेल व हा प्रयोग यशस्वी झाला तर बाकी लॉटही पाठविला जाईल.

यापूर्वीच हा विचार का झाला नाही याची माहिती देताना देशमुख म्हणाले की बंदी आल्यांनतर गुटखा उत्पादकांनी या बंदीविरोधात हायकोर्टात १५ याचिका दाखल केल्या आहेत त्यामुळे ही पाकिटे निकाल लागेपर्यंत आम्हाला सांभाळून ठेवावी लागणार होती. मात्र या याचिकांतील ८ याचिकांचा निकाल लागला असून त्या याचिका फेटाळल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित पाकिटे नष्ट करता येणार आहेत.

पुण्यात घनकचर्याेपासून वीज निर्मितीचा देशातील पहिला वीज प्रकल्प रोचेम ग्रीन एनर्जी प्रा.लिमि.कंपनीने १५ सप्टेंबर पासून सुरू केला असून येथे दररोज २५० टन कचर्यारवर प्रक्रिया करून त्यापासून २.५ मेगावॉट वीज निर्मिती केली जात आहे. ७० टन घनकचर्याचपासून १ मेगावॉट वीज निर्माण होते असे या प्रकल्पाच्या अधिकार्यांलनी सांगितले.

Leave a Comment