दोन वर्षांमध्ये धोनी झाला पहिल्यांदा बाद

भारतात खेळत असताना गेल्या दोन वर्षांमध्ये कर्णधार धोनी वनडेत रविवारी पहिल्यांदा बाद झाला. धोनी शेवटच्या वेळी मोहाली येथे पाकविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात बाद झाला होता. त्यानंतर तो सलग आठ डावात नाबाद राहिला. त्याने नऊ डावात ५०६ धावा काढल्या. या दरम्यान, त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.

पाकविरुद्ध दिल्लीत झालेल्या तिस-या सामण्यात धोनी ३६ धावा काढून बाद झाला. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात तो नाबाद राहिला होता. पहिल्या सामन्यात त्याने शतक तर दुस-या सामन्यात त्याने अर्धशतक करीत तो नाबाद राहिला होता. एकीकडे टीम इंडियाची फलंदाजी खराब होत असताना कर्णधार धोनीने कर्णधार पदाला शोभेल अशी कमगिरी केली आहे.

पाकविरुद्ध दिल्लीतील तिसर्‍या वनडेत तीन षटकार ठोकल्याने धोनीच्या नावे आता १४६ षटकार झाले आहेत. वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत धोनी नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंझमाम-उल-हक व युवराज सिंग यांच्या नावावर सध्या प्रत्येकी १४४ षटकारांची नोंद आहे त्यांना धोनीने मागे टाकले आहे. त्यासोबतच कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने पाकविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात सईद अजमलचा झेल घेत वनडे क्रिकेटमध्ये आपले २०० झेल पूर्ण केले. धोनीने सामी अहमद यांच्या गोलंदाजीवर सईद अजमलचा २०० वा झेल पकडला. अशी कामगिरी करणारा धोनी हा सहावा यष्टीरक्षक बनला आहे.

Leave a Comment