दिल्ली सामूहिक बलात्कार खटल्याची सुनावणी ‘इन केमेरा’

नवी दिल्ली: धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान झालेल्या गोंधळामुळे विशेष द्रुतगती न्यायालयाच्या न्यायधीशांनी ‘इन कॅमेरा’ सुनावणी घेण्याचे आदेश देऊन या खटल्याशी थेट संबंध असलेल्या व्यक्तींशिवाय इतरांना न्यायकक्षात प्रवेश नाकारला.

राजधानीत दि. १६ डिसेंबर रोजी सिनेमा बघून मित्रासह घरी निघालेल्या युवतीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला आणि तिच्या मित्राला मारहाण करून चालत्या बसमधून फेकून देण्यात आले. या प्रकाराने देशभर संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकरणातील आरोपींना सोमवारी सकाळीच न्यायालयाच्या आवारात आणण्यात आले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष न्यायकक्षात हजर करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. एम. एल. शर्मा यांनी आरोपींच्या कुटुंबियांनी आरोपींच्या वतीने त्यांची बाजू मांडण्याची विनंती आपल्याला केली असून आरोपींचा वकील म्हणून आपले वकीलपत्र दाखल करून घ्यावे; अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या इतर वकिलांनी अ‍ॅड. शर्मा यांच्या निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. अ‍ॅड. शर्मा प्रसिद्धीला हपापलेले वकील असल्याचा आरोप इतर वकिलांनी केला. सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव साकेत न्यायालय बार असोसिएशनने केला आहे.

आरोपींचे वकील म्हणून अ‍ॅड. शर्मा यांना मान्यता देण्यास न्यायालयाने नकार दिला. अ‍ॅड. शर्मा यांनी प्रथम तिहार कारागृहात जाऊन आरोपींची भेट घ्यावी. त्यांची अनुमती असेल तरंच अ‍ॅड. शर्मा यांना त्यांचे वकीलपत्र घेता येईल; असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.

सहाव्या अल्पवयीन आरोपीवरील गुन्ह्यांची सुनावणी बाल न्यायालयासमोर होणार आहे. या प्रकरणातील आरोपींच्या विविध चाचण्यांद्वारे गुन्हे रासायनिक (फोरेन्सिक) प्रयोगशाळेत प्रबळ पुरावे हाती आले असून आरोपींवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते; असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

दरम्यान; अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी ‘एका हाताने टाळी वाजत नाही. पीडीत युवतीवरील अत्याचाराला ती स्वतः देखील आरोपींएवढीच जबाबदार आहे. तिने मध्यरात्री दारू प्यायलेले लोक असलेल्या बसमध्ये चढायलाच नको होते; असे विधान करून आणखी एक वाद अंगावर ओढवून घेतला आहे. राजस्थान येथील टोंक येथे बोलताना त्यांनी हे विधान केले.

Leave a Comment