अपंग कलावंतांची प्रस्थापितांकडून उपेक्षा: कवयित्री प्रतिभा भोळे

पुणे: अंध, अपंग कलावंतांना कोणाच्या दयेची, सहानुभूतीची आवश्यकता नाही. मात्र केवळ अपंग म्हणून त्यांची उपेक्षा केली जाऊ नये अथवा त्यांना अनुल्लेखाने मारू नये; असे परखड मत सुप्रसिद्ध अंध कवयित्री प्रतिभा भोळे यांनी ‘माझा पेपर’शी बोलताना व्यक्त केले.

निसर्ग ज्या व्यक्तींमध्ये अपंगत्वाच्या स्वरूपात काही उणीव ठेवतो; त्याचवेळी त्याची भरपाई असाधारण एकाग्रतेची क्षमता किंवा मानसिक क्षमतेची देणगी देऊन करतो. त्यामुळे अंध, अपंग व्यक्तींमध्ये कमालीची कलासक्ती आणि प्रतिभा आढळून येते. आवश्यक ते प्रशिक्षण आणि योग्य वेळी संधी उपलब्ध झाल्यास हे कलावंत आपल्या कला, प्रतिभेच्या जोरावर आपल्या समाजाचे, भाषेचे आणि देशाचे नाव आंतराराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करू शकतात; असा विश्वास या कवयित्रीने व्यक्त केला. हेच उद्दिष्ट गाठण्यासाठी भोळे या आपले काही हितचिंतक आणि समविचारी सहकाऱ्यांच्या साथीने ‘फुलराणी थिएटर्स’च्या माध्यमातून करीत आहेत.

मराठी सांस्कृतिक क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ज्योत्स्ना भोळे यांच्याकडून परंपरेने प्रतिभेची देणगी लाभलेल्या या कवयित्रीला केवळ अंध असल्यामुळे कराव्या लागलेल्या; किंबहुना आजही करावा लागत असलेल्या संघर्षामुळे त्या काही प्रस्थापित साहित्यिक, कलावंत, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि सरकार यांच्याबद्दल तक्रार नाही पण नाराजी व्यक्त करतात. सन्माननीय अपवाद वगळता सांस्कृतिक क्षेत्रात अंध, अपंग कलावंत, साहित्यिकांची उपेक्षाच होत असल्याची भोळे यांची खंत आहे. अर्थात; अपंग म्हणून आपल्याला काही विशेष वागणूक अथवा प्राधान्य मिळावे अशी भोळे अथवा अन्य अपंग कलावंत, साहित्यिकांची अपेक्षा नाही. मात्र गुणवत्तेच्या जोरावर अन्य सर्वसामान्य कलावंतांप्रमाणे आपली कला जोखली जावी. केवळ अपंग म्हणून दूर ठेऊ नये; अशी भोळे यांची आग्रही आणि न्याय्य मागणी आहे.

पुण्यात पार पडलेल्या साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या काव्य संमेलनात पात्रता असूनही आपल्याला बोलाविले नसल्याची खंत भोळे यांनी व्यक्त केली. मन:चक्षू हा कविता संग्रह, हुंकार हा चारोळी संग्रह आणि रंग प्रतिभेचे हा अल्बम प्रसिद्ध असूनही आपण केवळ अंध असल्याने प्रस्थापित मंडळी आपल्याला बरोबरीचे स्थान देत नसल्याचा भोळे यांचा आरोप आहे. असे कलावंत आणि साहित्यिक त्यांचा अनुभव आणि वय लक्षात घेता नवोदितांमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत आणि प्रस्थापित मंडळी त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुरुप सन्मान देत नाहीत. अशाप्रकारे दोन्ही बाजूने अंध, अपंग साहित्यिक, कलाकारांची कुचंबणा होत असल्याचे भोळे निदर्शनाला आणून देतात.

अंध, अपंग, मूकबधीर यांच्याकडे चित्रकला, गायन, वादन, साहित्य निर्मितीची उत्तम गुणवत्ता आहे. मात्र केवळ त्यांची उपेक्षा केल्याने त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नाही आणि त्यांच्यातील कलाकार, साहित्यिक पूर्णपणे विकसित होण्यास वावंच मिळत नाही; अशी भोले यांची खंत आहे. तब्बल शंभर कविता करूनही प्रस्थापितांच्या उपेक्षेमुळे एका अंध कवयित्रीची काव्य निर्मितीची उर्मीच संपून गेल्याचे उदाहरण त्यांनी दिले. पात्रता नसलेल्या अनेकांना साहित्य, विश्वसाहित्य संमेलनांच्या निमित्ताने शासकीय अथवा संस्थांच्या खर्चाने देश, परदेशात वाऱ्या घडवून आणल्या जातात. मात्र पात्रता असूनही एखाद्या अंध, अपंग कलावंत साहित्यिकांना ही संधी मिळत नसल्याचा आरोप भोळे यांनी केला.

केवळ या सर्व तक्रारींचा पाढा वाचून ही कवयित्री इतरांच्या नावाने खडे फोडत नाही. अपंग आणि सुदृढ नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी भोळे यांनी सन १९९५ मध्ये ‘फुलराणी थिएटर’ची स्थापना करून प्रचीती सुरू, भूषण तोष्णीवाल, पुष्पा तिवारी यांच्यासारखे अनेक कलाकार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला मिळवून दिले आहेत. बोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने कलावंत, साहित्यिकांची ही यादी वाढंतच जाईल; हे निश्चित!

मात्र या धडपडीत आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ याचा अभाव असल्याची खंत भोळे यांनी व्यक्त केली. अपंग कलाकार, साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या संस्थांच्या कार्यक्रमांना सभागृह, रंगमंचाच्या भाड्यात ५० टक्के सवलत मिळावी; सातत्यपूर्ण असे उपक्रम करणाऱ्या संस्थांना शासनाकडून अनुदान मिळावे; प्रज्ञावंत अपंगांना समाजाच्या मूळ प्रवाहात सामावून घेण्यासाठी सक्षम व्यक्तींनी सक्रिय साहाय्य करावे; अशा अपेक्षा भोळे यांनी व्यक्त केल्या. ‘फुलराणी’च्याच एका कार्यक्रमात विख्यात साहित्यिक आणि गायक आनंद माडगूळकर यांनी अंध, अपंग कलाकारांच्या कार्यक्रमांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीसारख्या माध्यमांनी राखीव वेळ देऊन असे कार्यक्रम नियमितपणे प्रसारित करावे; अशी सूचना केली होती. या सूचनेचा किमान शासकीय माध्यमांनी विचार करून तो अमलात आणावा; अशीही त्यांची अपेक्षा आहे.

Leave a Comment