तापमान वाढ, दहशतवादाला भारतीय अध्यात्मात उत्तर- मोदी

अहमदाबाद दि.७ – जागतिक तापमान वाढ, त्यामुळे पर्यावरणाचे निर्माण होणारे प्रश्न तसेच दहशतवाद या सारख्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी  भारतीय अध्यात्माचा स्वीकार हाच उपाय असल्याचे मत गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. अक्षर पुरूषोत्तम स्वामी संस्थेच्या ६० व्या युवा वार्षिक मेळाव्याच्या समारोप समारंभात ते बोलत होते.

मोदी म्हणाले की जगाने आय टी क्षेत्रात भारतीय तरूणांची पॉवर आता ओळखली आहे मात्र भारतीय अध्यात्माची ताकद अजून जगाला कळलेली नाही. जागतिक तापमान वाढ, पर्यावरण हानी यासारख्या जगाला त्रस्त करत असलेल्या प्रश्नांना आपल्या संत महत्मांनी स्वीकारलेल्या अध्यात्माच्या मार्गातून उत्तर मिळू शकते. अखिल मानव जात पर्यावरण हानीने ग्रासली गेली आहे. आपल्या देशातील संतांनी मात्र निसर्गाला मातेचा दर्जा पूर्वीपासूनच दिला आहे आणि अध्यात्माच्या मार्गातून निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन यालाच महत्त्व दिले आहे. वसुधैव कुटुंबकम या तत्त्वज्ञानाचा स्वीकार के ल्यास दहशतवादाच्या प्रश्नाला उत्तर मिळू शकते असेही ते म्हणाले.

सरदार पटेल स्टेडियमवर झालेल्या या मेळाव्यासाठी भारताबरोबरच कॅनडा, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई येथून सुमारे २५ हजार युवक उपस्थित होते. प्रमुख स्वामी आजारी असल्याने त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून या युवकांना संदेश दिला आणि सत्संग, मातापित्याची आणि देशाची सेवा हाच उन्नतीचा खरा मार्ग असल्याचे सांगितले.

Leave a Comment