माजी खेळाडूचा टीम इंडियावर हल्लाबोल

गेल्या काही दिवसापासूनची टीम इंडियाची खराब कामगिरी पाहून सर्वच बाजूनी टीकेची झोड उठली आहे. यामध्ये माजी खेळाडूनी तर टीम इंडियाविरुद्ध सध्या आघाडीच उघडली आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार सुनील गावस्कर, के. श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ, संजय मांजरेकर, विनोद कांबळी यांनी तर हल्लाबोल सुरु केला आहे. तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीला कर्णधारपदावरून दूर केले जाण्याआधीच त्याने तात्काळ पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असा सूर निघत आहे. त्याबद्दल थोडेसे….

टीम इंडियाच्या खालावलेल्या कामगिरीला इंडियन प्रीमियर लीगच (आयपीएल) जबाबदार असल्याचा हल्लाबोल काही माजी खेळाडूनी केला आहे. यामध्ये टीम इंडिया माजी कर्णधार सुनील गावसकर आघाडीवर असून त्याच्या सुरात सूर पाकचा माजी कर्णधार इम्रान खाननेही मिसळला आहे. बर्‍याच टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंचे लक्ष आयपीएलमध्ये खेळून पैसा कमविणे हेच आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात बरेच खेळाडू दुखापतग्रस्तसुद्धा झाले आहेत. तरीसुद्धा ते आयपीएलमध्ये खेळून मालामाल झाल्यावर त्यांनी आपल्या दुखापतींवर इलाज करून घेतला. टीम इंडियाचा एखादा दौरा चुकला तरी चालेल; परंतु कोणत्याही परिस्थितीत आयपीएलमध्ये खेळायचं, असा निर्धार या खेळाडूंनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून टीम इंडियासाठी चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणेच गैर आहे अशा शब्दात सुनील गावस्करने फटकारले आहे.

गेल्या काही दिवसात टीम इंडियाची गोलंदाजी कधीच ग्रेट नव्हतो. गोलंदाजीतील अपयश आपण फलंदाजीत भरून काढात होतो. मात्र २०११ च्या वर्ल्डकपपासून आपल्या फलंदाजीलाही उतरती कळा लागली आहे. ज्या संघात धड गोलंदाज नाहीत की फलंदाज त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आपण करू शकतो. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीबाबत चोफेर टीका होत आहे.

चेन्नईत झालेल्या पहिल्या वनडे क्रिकेट सामन्यात ५ बाद २९ अशा वाईट स्थितीतून सावरण्यासाठी धोनीच्या शतकी खेळीने मदत केली. अन्यथा आपण वाईट पद्धतीने हरलो असतो. त्या सामन्यात आपल्या टीमने ज्याप्रमाणे पुनरागमन केले ते बघून आपल्याकडे क्षमता आहेच, असे म्हणू शकतो. मात्र, दुसरीकडे आपण कोलकाता येथे झालेल्या दुस-या वनडेत २५१ धावांचे सोपे लक्ष्य गाठू शकलो नाही. आपला ८५ धावांच्या मोठ्या अंतराने पराभव झाला आणि मालिकेत पुनरागमन करू शकलो नाही.

गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सुरेश रैना आणि युवराजसारखे दिग्गज सुपरफ्लॉप ठरल्याने टीमवर दबाव वाढला आणि आपला पराभव झाला. बघितले तर धोनीला गोलंदाजांचीसुद्धा पुरेशी मदत मिळालेली नाही. आपले बरेच गोलंदाज जखमी असल्यामुळे आपसातील ताळमेळ बिघडले आहे. यात धोनी दुर्दैवी म्हणावा लागेल. सर्व काही आपल्याशी प्रतिकूल होत असताना आपल्याला कर्णधारपदावरून दूर केले जाण्याआधीच त्याने तत्काळ पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्याच्या राजीनाम्यानंतर टीम इंडियाचे प्रदर्शन सुधारेल, असेही घडू शकते. गेल्या १८ महिन्यांत धोनीच्या नेतृत्वात टीमने खास दिवे लावलेले नाहीत.

गेल्या एक वर्षात टीम इंडियाचे बरेच स्थिरावलेले खेळाडू बाहेर झाले. बरेच खेळाडू आले आणि गेलेही. टीम सध्या परिवर्तनाच्या काळातून जात आहे. अशात नवोदितांना अधिक संधी मिळत आहेत. आपल्या सीनियर्सने ज्याप्रमाणे खूप मेहनत घेऊन टीमला मोठे यश मिळवून दिले, त्याचप्रमाणे नवोदितांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहे तरच येत्या काळात टीम इंडिया गेलेला सूर परत मिळवू शकेल.

Leave a Comment