संघचालकांचे निषेधार्ह निवेदन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूंची संघटना आहे. ही संघटना हिंदूंना एकत्र आणण्याचा गेल्या ८० वर्षपासून प्रयत्न करीत आहे. पण त्यांच्या मागे तीन साडे तीन टक्के  हिंदूंशिवाय कोणीही जात नाही. त्यावर संघाचे नेते, हिंदूंना अजून संघ समजला नाही असे म्हणत असतात पण वस्तुस्थिती अशी आहे की संघाला अजून हा हिंदू समाज समजलेला नाही. त्यामुळे हिंदू लोक संघाच्या आज्ञा मानत नाहीत. हा समाज त्यांच्या आज्ञा मानत असता तर आज संघचालकांनी सर्वांना आपल्या मुलामुलींचे शिक्षण बंद करण्यास आणि त्यांना लक्ष्मण रेषेच्या आत टाकण्यास फर्मावले असते. कारण मुली घराच्या बाहेत पडल्यामुळे त्यांच्यावर बलात्कारासारखे अत्याचार होत असतात असे त्यांचे मत आहे.

सर  सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजवर दिल्लीतल्या बलात्काराच्या घटनेवर काही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. ती त्यांनी  काल केली. संघ ही प्रतिगामी संघटना आहे असा संघाच्या विरोधकांचा नेहमीच आक्षेप असतो. संघाचे नेते हा आरोप नेहमीच टाळत आले आहेत पण एखादा तोंडी निवेदन करून टाळत असतानाच नकळतपणे हे लोक त्या आरोपाला पुष्टी देणारी देणारे वर्तनही करीत असतात. काही वेळा आपली संघटना प्रतिगामी नाही असा खुलासा करणे निराळे असते. तसा खुलासा करण्याला काही पुरावा  द्यावा लागत नाही पण एखाद्या प्रसंगात विचारांची कसोटी लागते तेव्हा मात्र मुळात असलेला विचार व्यक्त होतो. 

आता या बलात्काराच्या प्रकरणात सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी असे बलात्कार होण्यास पाश्चात्त्य संस्कृती कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. आपल्या देशापेक्षा पाश्चात्त्य देशात बलात्काराचे प्रमाण अधिक आहे असे मत त्यांनी मांडले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की,  लक्ष्मण रेषा ओलांडल्यावर रावण येणारच. एवढ्या मोठ्या हिंदूंच्या संघटनेचे प्रमुख काहीतरी बोलतात तेव्हा आपण त्यावर टिप्पणी केली पाहिजे. पण ते नेमके काय बोलले आहेत याची नीट शहानिशा झाली पाहिजे.आपल्या देशात अनेकदा कोण काय बोलले आहे याची शहानिशा न करताच लोक त्यावर आपले मत मांडायला लागतात.

आता मोहन भागवत यांची तीनच विधाने वृत्तवाहिन्यांवर झळकली आहेत. ‘बलात्काराच्या वाढत्या घटना हा पाश्चात्या संस्कृतीचा परिणाम’, ’पाश्चात्य देशात आपल्या देशापेक्षा अधिक बलात्कार होतात’, आणि ‘लक्ष्मणरेषा ओलांडल्यास रावण येणारच’, ही ती तीन विधाने आहेत. त्यांचा कसलाही खुलासा किवा तपशील कोणत्याही वाहिनीवर आलेले नाहीत. पण तरीही आता  वाहिन्यांवर विचारवंतांच्या चर्चा झडायला लागतील. यावर चर्चा झाली पाहिजे पण त्या आधी भागवत काय बोलले आहेत याचे तपशील कळले पाहिजेत. मागचा पुढचा संदर्भ सोडून कोणाच्या कसल्या तरी विधानावर चर्चा व्यक्त करणे किवा त्यावर आपले मत व्यक्त करणे हे त्या व्यक्तीवर अन्याय करणारे ठरते. आपल्या देशात अशी टीका करण्याची पद्धत आहे. पण आता भागवत यांच्या विधानावर टिप्पणी केली तर त्यांच्यावर असा अन्याय होणार नाही असे वाटते. कारण त्यांची ही तीन विधाने संदर्भासह घेतली काय की संदर्भ सोडून घेतली काय त्याने फार फरक पडणार नाही.

बलात्कार हा पाश्चात्त्य संस्कृतीचा परिणाम आहे असे भागवत यांचेच मत आहे की, त्यांनी असे कोणाचे तरी मत आहे असे म्हटले होते. याचा शोध घेतला पाहिजे. आणि इतर दोन मतेही त्यांचीच आहेत की ती अन्य कोणाची तरी म्हणून त्यांनी उद्धृत केली होती याचाही तपास केला पाहिजे. आलेल्या बातम्यांत तरी हे भागवत यांचेच मत असल्याचे म्हटले आहे. काही वेळा अनेक बातमीदार एखादा वक्ता नेमके काय बोलत आहे हे नीट ऐकतच नाहीत. त्या वक्त्याने अन्य कोणाचे तरी मत आपल्या वाक्यात संदर्भासाठी नमूद केले तरी काही पत्रकार  ते वाक्य त्या वक्त्याच्या तोंडी घालतात आणि खळबळ उडवून देतात.

काही पत्रकार एखादे भाषण ऐकताना त्या वक्त्याला नेमकेपणाने काय म्हणायचे आहे हे जाणून घेत नाहीत. त्याच्या भाषणात वादग्रस्त विधान येतेय का याची ते वाटच पहात असतात. या प्रकारात भागवत यांनी व्यक्त केलेली तीन मते त्यांचीच आहेत. संघालाही हे मान्य आहे. एवढेच नाही तर या विधानांचा परिणाम फार वाईट होईल याची जाणीवही संघाच्या प्रवक्त्याला झाली आहे. म्हणून संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी मोहन भागवत यांच्या या मतामागे काही संदर्भ आहेत असे म्हणून सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला आहे. या सारवा सारवीतच संघाचा अपराधगंड लपलेला आहे. आपले सरसंघचालक भलतेच चुकीचे बोलून गेले आहेत हे त्यांच्या लक्षात आले आहे.

मोहनराव भागवत यांचे हे म्हणणे इतके कुतर्कावर आधारलेले, महिलांबाबत असहिष्णुता व्यक्त करणारे आणि लोकांना न पटणारे आहे की त्याची लोकांत तीव्र प्रतिक्रिया उमटणार आहे याची त्यांना जाणीव झाली आहे. संघाचे काही ज्येष्ठ नेतेही सरसंघचालकांशी सहमत होणार नाहीत इतके ते आक्षेपार्ह आहे. ही सारी विधाने त्यांनीच केली असतील तर त्यांचा प्रतिवाद करण्याचीही गरज नाही. एकोणिसाव्या शतकांत महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षण द्यायला सुरूवात केली तेव्हाच्या बुरसटलेल्या विचारांच्या सनातन्यांनी त्यांना काही युक्तिवाद करून विरोध केला होता. त्या युक्तिवादात आणि मोहन भागवत यांच्या आजच्या या युक्तिवादात काहीही फरक नाही. त्या सनातन्यांना आपल्या देशातल्या सुधारकांनी उत्तरे दिली होती. तीच उत्तरे आता मोहन भागवत यांना द्यावी लागतील. मोहन भागवत यांच्या या विधानांचा कराल तेवढा निषेध थोडाच आहे.

Leave a Comment