शिवाजी पार्कवरील कार्यक्रम परवानग्यासांठी न्यायालयात येऊ नका

मुंबई दि.५ – मुंबईच्या शिवाजी पार्क या खेळाच्या मैदानावर कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याचा परवानगीसाठी उच्च न्यायालयाकडे येऊ नये तर शासनानेच वर्षातील तीस दिवस या मैदानावर कार्यक्रम घेण्यासाठीच्या परवानग्या द्याव्यात व तसे नोटीफिकेशन वर्षभरासाठी जारी करावे असे उच्च न्यायालयातील चीफ जस्टीस मोहित शहा आणि ए.व्ही.मोहता यांच्या खंडपीठाने शासनाला सुनावले आहे.

या संबंधी मिळालेल्या माहितीनुसार इस्कॉन संस्थेने ८ते १३ जानेवारी दरम्यान या मैदानावर रथयात्रेचे आयोजन करण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली होती मात्र परवानगी न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. न्यायालयाने या वर्षासाठी परवानगी देताना पुढील वर्षी परवानगी हवी असेल तर शासनाकडे मागा असे सांगितले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार या खेळाच्या मैदानावर अन्य कोणत्याही कार्यक्रमांसाठी सरकारला वर्षातील ३० दिवस परवानगी देण्याचा अधिकार आहे. सध्या चार कार्यक्रमांसाठी येथे अधिकृत परवानगी असून त्यात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, डॉ.आंबेडकर जयंती आणि महाराष्ट्र दिन यांचा समावेश आहे.

न्यायालयाने सरकारला असेही कळविले आहे की या मैदानावर ज्या संस्थांना आपले कार्यक्रम करायचे आहेत त्यांनी नोव्हेंबरमध्येच पुढील वर्षासाठीच्या तारख्या कळविल्या पाहिजेत आणि सरकारनेही तसे नोटीफिकेशन जारी केले पाहिजे. त्यासाठी न्यायालयात येऊ नये. हे मैदान सायलंट झोन आहे त्यामुळे येथे अधिकृत परवानगी घेतल्याशिवाय कार्यक्रम करता येत नाहीत.

Leave a Comment