विपरीत बुद्धी

महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या आघाडीचा कारभार कसा चालला आहे हे सारी दुनिया जाणते आहे. या आघाडीच्या राज्यात भ्रष्टाचाराचा धुमाकूळ माजला आहे पण तरीही विरोधी पक्ष मजबूत नसल्यामुळे हीच आघाडी आपल्या उरावर बसली आहे.  ती काही हटत नाही. विरोधी पक्ष वरचेवर क्षीण होत आहे. राज्यात ही क्षमता भाजपा- सेना युतीत आहे. आता या युतीला रिपाईची जोड मिळाली आहे पण ही तिघांची युती झाल्यापासून तिचा काही प्रभाव पडलेला नाही. उलट युतीत आपापसात मतभेद आहेत. भाजपात मुंडे आणि गडकरी यांच्यात ताळमेळ नाही आणि शिवसेनेचा प्रभाव बाळासाहेबांच्या माघारी कितपत टिकतोय याबाबत संशय आहे.

काही वेळा काही राजकीय पक्षात असे काही विचित्र लोक असतात की त्यांना परिस्थितीचे मुळीच गांभीर्य नसते. भाजपाही त्याला अपवाद नाही. भाजपातही असे लोक आहेत. आपल्या युतीच्या या अवस्थेत आपण युतीत अंतराय निर्माण होईल असे काहीही न करता ती मजबूत कशी होईल यासाठीच पावले टाकली पाहिजेत एवढी सामान्य गोष्टही त्यांना कळत नाही. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस या अशाच प्रकारच्या नेत्यांत जमा आहेत. त्यांनी विदर्भाच्या मुद्यावरून शिवसेनेला फैलावर घेतले.

शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला विरोध आहे आणि भाजपाचा त्याला पाठींबा आहे. हा भेद काही आजचा नाही. या दोन पक्षांची युती झाल्यापासून तो आहे. भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्याला पाठींबा दिला होता आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषकांत दुरावा निर्माण करणारे हे विभाजन कधीही मान्य करणार नाही अशी गर्जना केली होती. या दोन पक्षांत हे मतभेद असूनही त्यांची युती झाली होती. या मुद्यावरून ही युती मोडावी असा प्रस्ताव किवा कल्पना आजवर कोणीही मांडली नव्हती. पण शोभाताई फडणवीस यांनी काल एकदम हा बाँबगोळा टाकला. महाराष्ट्राचे शासन विदर्भावर अन्याय करते. त्यावर शिवसेना काही आवाज उठवीत नाही. शिवसेनेचे विदर्भाविषयीचे हे प्रेम म्हणजे  पुतना मावशीचे प्रेम आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीने आता शिवसेनेशी युती मोडावी असे शोभाताईंनी म्हटले.    

शिवसेनेला विदर्भाचे वेगळे राज्य मान्य नाही हे खरे आहे पण त्यामुळे विदर्भावर अन्याय झालेला चालतो असे काही शिवसेनेने म्हटलेले नाही. विदर्भाच्या मागण्यावर शिवसेनेने अनेकदा आवाज उठवला आहे. शिवसेनेचे हे प्रेम पुतना मावशीच्या प्रेमासारखे कसे आहे हे शोभाताईंनी कधी दाखवून दिलेले नाही. असे शिवसेनेने नकली प्रेम दाखवले असल्याची प्रकरणे कधी त्यांनी दाखवून दिलेली नाहीत. आपल्या मित्र पक्षावर त्यांनी तुटून पडावे असे काय घडले आहे हे त्यांनी सांगितले नाही. विदर्भावर अन्याय होतो आणि हा अन्याय दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतंत्र विदर्भ असे ताईंचे म्हणणे आहे आणि ही गोष्ट शिवसेनेला मान्य नसेल तर शिवसेनेचे प्रेम हे नकली प्रेम ठरेल अशी ताईंची मांडणी आहे.

याचा अर्थ असा की विदर्भाचे वेगळे राज्य नको असे म्हणणारे सगळेच लोक विदर्भाचे शत्रू आहेत असे त्यांना म्हणायचे आहे. त्यांचे हे म्हणणे तर्काला न पटणारे आहे. विदर्भावर प्रेम करूनही विदर्भ स्वतंत्र राज्य नको असे म्हणता येते. वेगळे राज्य मागणार्यांतचा पान्हा खरा आणि राज्याला पाठींबा देणारांचा पान्हा मात्र पुतना मावशीचा हे तर्कशास्त्र कोणीही जाणता माणूस मान्य करणार नाही. उलट विदर्भाचे कमालीचे कैवारी असलेले अनेक लोक विदर्भाच्या प्रगतीसाठी संघर्ष करीत असतात पण त्याचवेळी वेगळा विदर्भ आवश्यक नाही अशीही भूमिका मांडत असतात. माजी मंत्री आणि अभ्यासू नेते म्हणून ख्यातनाम असलेल्या कै. श्रीकांत जिचकार यांनी तर वेगळे विदर्भ राज्य स्वयंपूर्ण होऊ शकणार नाही असे आकडेवारी निशी सिद्ध करून दिले होते.

विदर्भाच्या सब बिमारीयोंपर वेगळा विदर्भ ही  एकमेव अक्सीर दवा आहे हे म्हणणे शोभाताईंचे असेल पण ते सर्वांनी मान्य केले पाहिजे आणि स्वतंत्र विदर्भ न मागणार्यांहना विदर्भाचे शत्रू मानले पाहिजे हे तर्कालाही धरून नाही आणि आकडेवारीलाही धरून नाही. शोभाताईंचा मात्र तसा आग्रह आहे. असा अट्टाहास हा एक विषय आहे आणि युती हा दुसरा विषय आहे पण ताईंनी हे दोन विषय एकत्र करून युती तोडण्याचे आवाहन केले आहे. यात व्यवहारीपणा काय आहे हे समजत नाही. ही युती मोडली तर भाजपाचे काय होईल याचा विचार त्यांनी केला आहे का ?

भाजपाची अवस्था आज काय झाली आहे ? शिवसेनेशी युती केलेली असूनही भाजपाला राज्यात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या ग्रामपंचायतीही मिळवता आलेल्या नाहीत. नगरपालिकांत भाजपा कोठेच नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत काय होणार याची काही शाश्वती नाही. अशा अवस्थेत युती मोडण्याच्या गोष्टी बोलणे हे संघटनात्मक दृष्ट्याही घातक आहे. ही गोष्ट ताईंसारख्या अनुभवी नेत्यांनाही कळू नये याचे आश्चर्य वाटते. त्यांनी अशी टोकाची भूमिका घेताना निदान आपल्या पक्षाच्या नेत्यांची अवस्था काय होईल याचा विचार करायला हवा होता. 

Leave a Comment